लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शनिवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेसाठीच लोक पडले घराबाहेर पडले. मुंबईतील रस्त्यावर वाहतूक केवळ १० ते १५ टक्के होती. नेहमीच्या तुलनेत रस्त्यावरील वाहनांमध्ये ८५ ते ९० घट झाली, असे वाहतूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
आज मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी झालेली पहायला मिळाली. शनिवारी लॉकडाऊनची अंमलबजावणी असल्याने सर्व दुकाने, कार्यालये बंद होती. केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित दुकाने सुरू होती. बस आणि एसटीमध्येही नेहमीच्या तुलनेत तुरळक प्रवासी होते. सध्या रस्त्यावर जी वाहनांची गर्दी होते, त्याच्या तुलनेत ८५ ते ९० टक्के वाहने कमी होती, अशी माहिती वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिली. कठोर नियमावलीमुळे अनेकजण घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत होता. दादर, वरळी, एलबीएस मार्ग, ईस्टर्न एक्स्प्रेस वे, वेस्टर्न एक्स्प्रेस वे, फ्री वे, लालबाग उड्डाणपूल, बीकेसी या भागात वाहनांची वर्दळ कमी झाली.
एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यांत लॉकडाऊन असल्याने एसटी वाहतूक बंद आहे. मुंबईत एसटीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार एसटीतून आसनक्षमतेइतकी प्रवासी वाहतूकची मुभा आहे, उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही, पण शनिवारी काही अपवाद वगळता राज्यात एसटी पूर्णपणे बंद होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शनिवारपासून लॉकडाऊन केला जात आहे. आज दररोजच्या तुलनेत वाहनांची गर्दी कमी झाली आहे. सर्व बंद असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी झाली असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
केवळ १० टक्के रिक्षा, टॅक्सी रस्त्यावर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार रिक्षाने २, तर टॅक्सीने क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे. लॉकडाऊनमुळे लोक घराबाहेर पडत नसल्याने रिक्षा, टॅक्सीला १० टक्के प्रतिसाद मिळाला, तर ज्या रिक्षा, टॅक्सी रस्त्यावर होत्या त्यांना ५० आणि रुपयांचा धंदा झाला, असे स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी सांगितले.