रस्ता, नाल्याच्या निकृष्ट कामामुळेच चौघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 05:51 AM2019-04-20T05:51:54+5:302019-04-20T05:52:00+5:30
मित्रांच्या अंगावर कोसळला आणि त्याखाली दबून चौघांचा मत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना विक्रोळी पार्क साईट परिसरात घडली.
मुंबई : चेंबरमध्ये अडकलेला ट्रक काढताना बाजूला गप्पा मारत उभ्या असलेल्या मित्रांच्या अंगावर कोसळला आणि त्याखाली दबून चौघांचा मत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना विक्रोळी पार्क साईट परिसरात घडली. रस्ता आणि नाल्याच्या करण्यात आलेल्या निकृष्ट कामामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप सूर्यानगरच्या स्थानिकांनी केला आहे.
येथील रस्ता आणि नाल्याचे काम काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. मात्र, हे काम निकृष्ट असल्याचा आरोप करत, स्थानिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. या भागातून मोठी वाहने जातात. त्यामुळे याचा फटका बसत अपघाताची भीती स्थानिकांनी यापूर्वीच वर्तवली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच चौघांचा बळी गेला, असा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
पोलीस ठाण्याला घेराव
संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत अटकेची कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी संपूर्ण सूर्यानगर रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी त्यांची समजूत काढत, त्यांना कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत तरुणांच्या नातेवाइकांना नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी सूर्यानगरच्या रहिवाशांनी केली आहे.
>ते जेवण ठरले अखेरचे
अपघातात मरण पावलेले चौघेही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. त्यातील अश्विन हेवारे (३२) हे सेनेचे शाखा युवाधिकारी होते. पत्नी, आईवडील आणि अडीच वर्षांच्या मुलीसोबत ते राहायचे. गुरुवारी रात्री कुटुंबासोबत जेवण उरकून, फेरफटका मारून येतो, असे सांगून ते बाहेर पडले होते. त्यांची चिमुरडी बाबा कधी येतील, याकडे डोळे लावून आहे.