रस्ता खचला... चिखल पाण्यातून वाट काढत देवेंद्र फडणवीस पोहोचले बांधावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 04:08 PM2020-10-19T16:08:16+5:302020-10-19T16:20:30+5:30
Devendra Fadnavis: अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी फडणवीस यांनी बारामतीमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी, काही शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंतही पावसाच्या पाण्यामुळे जाता येत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
मुंबई - अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, त्यांचं काम काय, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी फडणवीस यांनी पावसाच्या पाण्यातून आणि चिखलातून मार्ग काढला.
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी फडणवीस यांनी बारामतीमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी, काही शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंतही पावसाच्या पाण्यामुळे जाता येत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तसेच, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील रस्ता पूर्णपणे खचला असून घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, त्याला तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, पाण्यातून आणि चिखलातून वाट काढत फडणवीस यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
📍स्वामी चिंचोली येथे रस्ता पूर्णपणे खचला.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 19, 2020
पावसाची ही आहे तीव्रता. घरांचे नुकसान सुद्धा मोठे आहे.
शेतकरी पूर्णपणे उध्दवस्त झाला आहे, त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे.
#ओला_दुष्काळpic.twitter.com/X7pUYYSSY9
'सोयीस्कर राजकीय भूमिका कोणीच घेऊ नये. मदत कशी मिळते हे सगळ्याच नेत्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करेलच. पण पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्यानं तातडीनं मदत करावी. राज्य सरकारनं केंद्राच्या मदतीची वाट बघत राहू नये. ते स्वत: काय करणार ते त्यांनी सांगावं,' असंही फडणवीस म्हणाले.
📍Swami Chincholi, Daund taluka, Pune.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 19, 2020
Road entirely damaged at Swami Chincholi.
Houses also damaged.
Our farmers need immediate assistance. #ओला_दुष्काळ#MaharashtraRainspic.twitter.com/2FqpTEM7hw
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात वाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याची टीका भाजप नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा बचाव केला. बाकीचे नेते, मंत्री प्रत्यक्ष फिल्डवर जातील. परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल, अशी कार्यपद्धती आम्ही ठरवली असल्याचं पवार यांनी आज सांगितलं. त्यावर सरकार अपयशी ठरत असल्यानं पवारांना बचाव करावा लागतो, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं.