मुंबई :
प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून, मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे रस्त्यावर उतरून या कामांची पाहणी केली. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी एक हजार टँकर भाडेतत्त्वावर घेऊन संपूर्ण मुंबईतील रस्ते, पदपथ, चौक आलटून पालटून एक दिवसाआड धुवावेत, अशी सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला केली. त्यामुळे येत्या काही दिवसांत रस्ते धुण्याचे काम अधिक व्यापक प्रमाणावर होईल, अशी अपेक्षा आहे. महापालिका राबवत असलेल्या विविध उपाययोजना समाधानकारक आहेत, असे प्रशस्तिपत्रक शिंदे यांनी दिले.
मुंबई पायाभूत विकासाची कामे सुरू ठेवणे जितके आवश्यक आहे, त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रणदेखील आवश्यक आहे. पायाभूत प्रकल्पांनादेखील प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली आहे. फक्त पहाटेच नाही, तर दिवसाही मुख्य व मोठ्या नाक्यांवर, मुख्य चौकांमध्ये फॉगर मशीन्स लावण्यास सांगितले आहे. धूलिकण कमी करण्यासाठी मुंबईत ४० ठिकाणी वॉटर फॉगर आणि अँटीस्मॉग गन लावण्यात आल्या आहेत. कोळीवाडे, समुद्रकिनारे, वर्दळीची ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
पाहणी कुठे?पेडर रोड कलानगर, खेरवाडी जंक्शन, मराठा कॉलनी, मिलन भुयारी मार्ग परिसर, के पूर्व विभागामध्ये श्रद्धानंद मार्ग, दयालदास मार्ग, पायावाडी, मिलन उड्डाणपूल, जुहूतारा रस्ता, लिंकिंग मार्ग आणि टर्नर मार्ग.
कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्धारप्रदूषण रोखण्यासाठी आवश्यकता वाटल्यास कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल. त्यासाठी मुंबई महापालिका दुबईस्थित कंपनीशी करार करेल. या कंपनीची कृत्रिम पाऊस पाडण्याची अचूकता जास्त आहे. त्यामुळे मुंबईतील हवेतील प्रदूषण कमी होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
दौऱ्यात कोण सहभागी?पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त चंदा जाधव तसेच संबंधित अधिकारी.
रस्ते, पदपथ व सार्वजनिक ठिकाणी साचलेली धूळ ब्रशने हटवून त्यानंतर पाण्याने धुऊन स्वच्छता केली जात आहे. अपेक्षित अशी कामे होत असल्याचा आज मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. फॉगर, अँटीस्मॉग व इतर संयंत्राचा उपयोग केला जात आहे. ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, त्या सर्व ठिकाणी ग्रीन नेट लावण्यात आले आहेत. फॉगर, स्प्रिंकलर लावण्याचे आदेशही दिले आहेत. एकूणच, सर्व उपाययोजना आता अंमलात आल्या आहेत, याचे समाधान आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री