मुंबई - मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र. ५ आणि प्रभाग क्र. ११ मधील शनी मंदिर, चौगुले नगर ते नॅन्सी डेपो यामधील रस्ता गेल्या ४० वर्षे विकासापासून वंचित होता. सदर रस्त्याच्या मधोमध झोपड्या असल्याने रुंदीकरणासाठी मर्यादा येत होत्या. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतुकीच्या समस्या निर्माण होत होत्या. बससेवा सुरू करण्यात अडथळा निर्माण होत होता. परिणामी स्थानिकांना त्रास सहन करावा लागत होता.
याबाबत सातत्याने येथील शिंदे सेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती आणि गेली ४० वर्षे प्रलंबित असलेली समस्या अखेर मार्गी लागली.
रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या झोपडीधारकांचा प्रश्न देखील महत्त्वाचा होता.त्यांना बोरीवली (प) पंडीत मल्हारराव कुलकर्णी येथील पी.ए.पी इमारतीत ३०० चौ. फुटांची घरे देण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिले. त्यामुळे बाधित झोपडपट्टीवासियांना हक्काचे छप्पर मिळाले. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह पोलीस संरक्षण घेऊन सदर रस्ताच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे,शाखाप्रमुख सुनील मांडवे, सुभाष येरुणकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.