मुंबई : पावसाळ्याला अवघे तीन महिने उरले असताना पालिका प्रशासनाने रस्ते कामांचा बार उडवून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सुमारे ६३२ कोटींचे प्रस्ताव असे घाईघाईने मंजूर करण्यास भाजपने आक्षेप घेतला. तरीही कोरोनाचे कारण देत प्रस्ताव मंजूर करण्याची प्रशासनाचीमागणी स्थायी समितीने मान्य केली. यामुळे नाराज भाजप सदस्यांनी सभात्याग केला़ परंतु, रस्त्यांची कामे करण्यास ३१ मेपर्यंतची मुदत असल्याने ही कामे प्रत्यक्षात पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. मुंबईतील रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती प्रशासनाने स्थायी समितीला केली़ आयुक्त प्रवीण परदेशी यांनी याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना पत्र देऊन शहर विभागातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, रस्त्याच्या साइड स्ट्रिप आणि सीसी पॅसेजची सुधारणा करण्याचे प्रस्ताव मंजूर करण्याची लेखी विनंती केली.मात्र भाजपच्या सदस्यांनी रस्ते कामांची कोणतीही तातडीची गरज नसल्याचे मत व्यक्त करीत कोरोनाच्या नावाखाली प्रशासन दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीनेदेखील भाजपच्या हरकतीच्या मुद्द्याला समर्थन देत प्रस्ताव मंजूर करण्याची घाई करू नये, अशी मागणी केली. मात्र सत्ताधारी शिवसेनेने पाच प्रस्ताव बहुमताने मंजूर केले़ त्यामुळे संतप्त भाजप सदस्यांनी सभात्याग केला़अशी आहेत रस्त्यांची कामेसी - २७० शहर विभाग - २ मधील एफ/दक्षिण, एफ/उत्तर, जी/दक्षिण, जी-उत्तर विभागातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणद्वारे मजबुतीकरण, सुधारणा - १६४ कोटी ४८ लाख, ३२ हजार ३४० रुपये.सी - २७२ शहर विभाग - २ मधील एफ/दक्षिण, एफ/उत्तर, जी/दक्षिण, जी/उत्तर व ई विभागातील मुख्य रस्त्यांसह छोट्या रस्त्यांची दुरुस्ती-मजबुतीकरण - १५९ कोटी ४२ लाख ३५ हजार २१३.९४ रुपये.सी - २७१ ए, बी, सी, डी व ई विभागातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटने मजबुतीकरण, सुधारणा, परिरक्षण - ११४ कोटी ३४ लाख ०९ हजार रुपये.सी - २७३ ए, बी, सी व डी विभागातील विविध रस्त्यांच्या साइड स्ट्रिपचे काँक्रिटीकरण, दुरुस्ती, सुधारणा, मजबुतीकरण - १२० कोटी १९ लाख ३९ हजार ३८८ रुपये.पूर्व उपनगरातील एन विभागातील विविध रस्त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण, सुधारणा आणि परिरक्षण करणे - ९६ कोटी २० लाख ८१ हजार ७१३ रुपये.रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती प्रशासनाने स्थायी समितीला केली़
पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांची कामे मंजूर! ६३२ कोटींचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 2:57 AM