लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रस्त्यांच्या कामांबाबत मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत शहरातील रस्त्यांची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रस्तेकामांचे ऑडिट सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईतील आमदारांनी शहरातील सिमेंट रस्त्यांच्या घोटाळ्यावरून विधानसभेत गदारोळ केला होता. तेव्हा यासंदर्भात बैठक घेतली जाईल, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार व २० हून अधिक आमदार उपस्थित होते.
एजन्सींमध्ये समन्वयाचा अभाव, पारदर्शकतेचा अभाव, कंत्राटदारांकडून सब कॉन्ट्रॅक्ट दिले जात असल्याची, कंत्राटदारांकडून नियमांचे पालन न केल्याची तक्रार आमदारांनी केली. बांधकामांमध्ये कथित भ्रष्टाचाराचा मुद्दाही विरोधी पक्षाच्या आमदारांनी उपस्थित केला. ‘उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ३१ मे पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. तोपर्यंत महापालिका कोणत्याही नवीन रस्त्यांचे काम रखडवणार नाही. कंत्राटदारांना चालू कामांचे तपशील देणारे फलक लावण्यास व सोशल मीडियावर ऑडिट अहवाल प्रदर्शित करण्यास सांगितले जाईल’, असे शेलार यांनी सांगितले.
बैठकीत झालेले निर्णय
- ३१ मे पर्यंत जास्तीचे मनुष्यबळ वापरून रस्त्यांची कामे पूर्ण करावीत.
- नव्याने कोणतेही रस्ते आता खोदू नयेत.
- एप्रिलअखेरीस पाठपुरावा बैठक घेतली जाईल.
- अतिरिक्त असलेल्या महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका ते युटीलिटीज या सगळ्यांच्या विभागानुसार बैठका घेतील.
- प्रत्येक रस्त्याचे शेड्युल वेळापत्रक सहायक आयुक्त स्तरावर केले जातील.