रस्त्यांची कामे अर्धवट

By admin | Published: June 7, 2017 02:30 AM2017-06-07T02:30:18+5:302017-06-07T02:30:18+5:30

मुंबईतील नाल्यांची सफाई ९४ टक्के झाल्याचा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे तोंड रस्त्यांच्या कामांनी शिवले आहे.

Road works partially | रस्त्यांची कामे अर्धवट

रस्त्यांची कामे अर्धवट

Next

मुंबई : मुंबईतील नाल्यांची सफाई ९४ टक्के झाल्याचा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे तोंड रस्त्यांच्या कामांनी शिवले आहे. खडीचा पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर ठेकेदारांना दोनवेळा मुदतवाढ देऊनही रस्त्यांची कामे अर्धवटच आहेत. अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते पावसाळ्यात मुंबईकरांसाठी डोकेदुखीचे कारण ठरणार आहे. त्यामुळे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी कामे करून घेण्याचा सक्त इशारा पालिका अधिकाऱ्यांना प्रशासनाने दिला आहे. मात्र अशी समज देऊनही अद्याप दीडशे रस्त्यांची कामे रखडली असल्याने ठेकेदारांना आता कारवाईचा बडगा दाखवण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. परंतु कोट्यवधी रुपयांचे रस्त्यांचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदारांची थातुरमातुर कारवाईतच सुटका होत आहे.
या वर्षी महापालिकेने रस्त्यांची कामे तीन श्रेणींमध्ये विभागली आहेत. त्यानुसार रस्त्यांचे प्राधान्यक्रम ठरविण्यात आले. यामध्ये पावसाळ्यात खड्डे पडण्याची दाट शक्यता असलेल्या ११० रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी त्यांचा प्राधान्यक्रम १ ठरवण्यात आला. तर पावसाळ्यात काही दिवस तग धरू शकणाऱ्या २४८ रस्त्यांचा प्राधान्यक्रम २ ठरवण्यात आला.
मात्र यापैकी आतापर्यंत केवळ ९६ रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे. तर प्रकल्प रस्ते अंतर्गत काम हाती घेतलेले ४१५ रस्ते खोदण्यात आले आहेत. यापैकी ३७४ रस्ते पूर्ण झाले आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी ३ जूनपर्यंतची डेडलाइन होती. परंतु त्यानंतरही अद्याप बहुतांशी रस्ते खोदलेलेच आहेत. त्यामुळे प्राधान्य क्रम २ असलेल्या रस्ते कामांच्या ठेकेदारांना दंडाचा बडगा दाखवून काम करून घेण्यास अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे.
>कारवाईनंतर कामांना वेग; अधिकाऱ्यांचा दावा
अंधेरी पश्चिम, ओशिवरा आणि जुहू येथील रस्त्यांसाठी चार लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ कालिना, सांताक्रुझ आणि वांद्रे पूर्व येथून साडेतीन लाख, गोरेगाव येथून तीन लाख, कांदिवली, चारकोप आणि पोईसर येथून अडीच लाख आणि वांद्रे, खार आणि सांताक्रुझ येथून दोन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
मे महिन्याचा पंधरवडा उलटूनही ठेकेदारांकडून रस्ते काम संथगतीने सुरू होते. त्यामुळे किमान पाच हजार रुपये दंड या स्वरूपात कारवाईला सुरुवात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. निविदेतील अटी अनुसार ही कारवाई सुरू असून, यानंतरच ठेकेदारांच्या कामाला वेग आला, असा दावा अधिकारी करत आहेत.
प्राधान्यक्रम १ असलेल्या रस्त्यांच्या संथ कामासाठी ११ लाख रुपये तर प्राधान्यक्रम २ असलेल्या रस्त्यांसाठी १३ लाख रुपये दंड पालिकेने ठेकेदारांकडून वसूल केला आहे. आॅक्टोबर २०१६मध्ये या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले. यासाठी ३१ मे २०१७ची डेडलाइन निश्चित करण्यात आली होती. मात्र खडीचा पुरवठा बंद झाल्यामुळे रस्त्यांची कामे रखडली. यामुळे डेडलाइन ३ जूनपर्यंत वाढवण्यात आली. तरीही रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.
आतापर्यंतचा दंड
अंधेरी पश्चिम, ओशिवरा आणि जुहू - चार लाख रुपये
कालिना, सांताक्रुझ, वांद्रे पूर्व - साडेतीन लाख रुपये
गोरेगाव - तीन लाख रुपये
कांदिवली, चारकोप, पोईसर - अडीच लाख रुपये
वांद्रे, खार, सांताक्रुझ - दोन लाख रुपये
रस्ते कामाची आकडेवारी
प्रकार एकूण काम अर्धवट
रस्ते झालेले काम
प्राधान्य १ ११० १०३ ७
प्राधान्य २ २४८ ८० १६८
प्रकल्प रस्ते ४१५ ३२३ ९२
विभाग अधिकाऱ्यांवर जबाबदारी : तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या रस्त्यांची यादी देण्यास आयुक्तांनी सांगितले होते. त्यानुसार विभाग अधिकाऱ्यांनी यादी तयार केली असल्याने ही कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ठेकेदारांएवढीच अधिकाऱ्यांचीही आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची ताकीद विभाग अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिली आहे. यासाठी अधिकाऱ्यांकडून शपथपत्र मागविण्यात आले आहे. तसेच अर्धवट राहिलेल्या कामांचा जाबही अधिकाऱ्यांना विचारण्यात येणार आहे.

Web Title: Road works partially

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.