रस्त्यांची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 10:20 AM2024-10-12T10:20:35+5:302024-10-12T10:20:52+5:30
आचारसंहितेपूर्वी परवानगी न मिळाल्यास ही कामे निवडणूक होईपर्यंत लांबणीवर पडण्याची भीती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईतील टप्पा क्रमांक एकमधील काँक्रीटीकरणाची रस्त्यांची शिल्लक कामे आणि दुसऱ्या टप्प्यातील नवीन कामे ऑक्टोबरपासून सुरू होतील, असे मुंबई महापालिका प्रशासनाने सांगितले होते, मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कामांना प्रारंभ होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. वाहतूक पोलिसांकडून अजून परवानगी मिळाली नसल्याने कामे रखडल्याचे समजते. आचारसंहितेपूर्वी परवानगी न मिळाल्यास ही कामे निवडणूक होईपर्यंत लांबणीवर पडण्याची भीती आहे.
मुंबईत सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्चुन रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे केली जात आहेत. ही कामे टप्प्याटप्प्याने केली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या कामांना अजूनही सुरुवात झालेली नाही. पावसाळ्यामुळे थांबविलेली कामे आता पुन्हा हाती घेतली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील कामे सुरू होण्यास फारशी अडचण नाही. मात्र, खरा प्रश्न दुसऱ्या टप्प्यातील कामांचा आहे.
१० दिवस वाया
पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्यात ३०९ किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे केली जाणार आहेत. यात शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. १ ऑक्टोबरपासून कामांना सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र महिना सुरू होऊन १० दिवस झाले तरी कामे ठप्प आहेत. काही रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश काढून त्यांचे भूमिपूजनही झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात कामांना प्रारंभ झालेला नाही. ही कामे पुढील काही दिवसांत सुरू न झाल्यास ती आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.