लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत ज्याठिकाणी महापौर, लोकप्रतिनिधी, नगरसेवक नाहीत तिथे घोटाळे सुरू आहेत. शहरात सर्व मिळून साडेआठ हजार कोटींची कामे पडून आहेत आणि ही रस्त्यांची कामे होऊ नयेत यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी एनओसी देऊ नये यासाठी त्यांच्यावर खोके सरकारकडून दबाव आणला जात आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर शनिवारी केला.
मुंबईत पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, एका वर्षात खड्डेमुक्त मुंबई करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. कामे १ ऑक्टोबर २०२२ ते ३१ मे २०२३ पर्यंत पूर्ण होतील, असे सांगण्यात आले; पण एकाही रस्तेकामाला सुरुवात झाली नाही.
पालिकेकडून ३९७ किमी रस्त्यांची कामे सुरू
रस्ते कामांबाबत करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पालिकेकडून ३९७ किलोमीटर अंतराच्या ९१० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी जानेवारी २०२३ मध्ये कंत्राटदारांना काम देण्यात आले असून ही कामे पाच मोठ्या कंत्राटदारांमार्फत सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
ब्लॅकलिस्ट करणार का?
कन्स्ट्रक्शन साइटवरून येणाऱ्या धुळीवर कोणतेही नियंत्रण नाही. २४ पैकी १५ वॉर्डमध्ये वॉर्ड ऑफिसर नाहीत. परीक्षा होऊन निकालही लागला; पण नियुक्त्या थांबल्या असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. पाच कंत्राटदारांना पॅकेट कंत्राट दिले. या पॅकेट कॉन्ट्रॅक्टर्सपैकी एकाला टर्मिनेशनची नोटीस आली. या नोटीसची मुदत २६ ऑक्टोबरला संपली.