लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरे येथील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. आरे वसाहतीतील मुख्य रस्ता हा पालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर या रस्त्याची उंची वाढवण्यात आली आहे. मुख्य रस्त्याला असलेल्या जोडरस्त्याची उंची वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे या रस्त्यावर येताना वाहनचालकांना त्रास होतो. तरी या प्रकरणी जातीने लक्ष घालून सदर रस्त्यांची उंची समान करावी, अशी मागणी राजू लाळी यांनी पी दक्षिण वॉर्डचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांना एका पत्राद्वारे केली आहे.
आरे येथील मुख्य रस्त्याला लागून पदपथ सुरुवातीपासून अस्तित्वात नाही. रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेचा नागरिक पदपथ म्हणून वापर करतात. या रस्त्यावरील टोल रद्द झाल्यानंतर येथे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेष करून दुचाकी वाहनचालक या मोकळ्या जागेचा वापर करतात. पावसाळ्यात दुचाकी वाहने घसरून अपघात झाल्याच्या घटना आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन सदर दोन्ही रस्त्यांची उंची समान करावी, अशी मागणी गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी केली आहे.
-----------------------------------