हुश्श...रस्ते होताहेत बॅरिकेडमुक्त, ‘मेट्रो’ची कार्यवाही; मुंबईकरांचा प्रवास जलद होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 09:36 AM2024-05-02T09:36:19+5:302024-05-02T09:37:26+5:30

शितळादेवी, दादर, सायन्स म्युझियम येथील रस्ते लवकरच पूर्ववत.

roads are barricaded free in mumbai mmrc in action mode the journey of mumbaikars will be faster | हुश्श...रस्ते होताहेत बॅरिकेडमुक्त, ‘मेट्रो’ची कार्यवाही; मुंबईकरांचा प्रवास जलद होणार 

हुश्श...रस्ते होताहेत बॅरिकेडमुक्त, ‘मेट्रो’ची कार्यवाही; मुंबईकरांचा प्रवास जलद होणार 

मुंबई : मेट्रो- ३ मार्गिकेच्या कामांसाठी बॅरिकेड्स लावल्याने अरुंद झालेले मुंबईतील रस्ते आता मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आतापर्यंत १४.५३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील बॅरिकेड हटविले आहेत. आता माहीममधील शितळादेवी, वरळीतील सायन्स म्युझियम आणि दादर येथील मेट्रो स्थानकांच्या परिसरातील बॅरिकेड येत्या १५ जूनपर्यंत काढून हे रस्ते वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याचे नियोजन एमएमआरसीने केले आहे, अशी माहिती एमएमआरसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.     
  
बॅरिकेड लावून मागील सात वर्षांपासून अडविलेले रस्ते आता वाहनांसाठी खुले होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास जलद होणार आहे.

कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ या भुयारी प्रकल्पाच्या ३३ किमी लांबीच्या मार्गिकेच्या कामाला २०१६ मध्ये सुरुवात झाली. या मार्गिकेवर एकूण २७ स्थानके आहेत. एमएमआरसीच्या तेव्हाच्या नियोजनानुसार या मेट्रो मार्गिकेचा सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा जून २०२१ पर्यंत सुरू केला जाणार होता, तर कफ परेड ते बीकेसी हा दुसरा टप्पा जानेवारी २०२२ पर्यंत सुरू केला जाणार होता. मात्र, विविध कारणांनी हा प्रकल्प रेंगाळला. 

मेट्रो मार्गिकेच्या कामांसाठी मुंबईतील मुख्य रस्त्यांवर जागोजागी खोदकाम केले होते, तसेच बॅरिकेड लावून रस्ते अडविले होते. मात्र, कामाला विलंब झाल्याने बॅरिकेड्समुळे अरुंद झालेले रस्ते पूर्ववत होऊ शकले नाहीत. 

परिणामी, ठिकठिकाणी वाहतूककोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागत होते, तसेच १० ते २० मिनिटांचे अंतर गाठण्यासाठी तासभर कोंडीत अडकून पडावे लागत होते. त्यातून एमएमआरसीला टीकेलाही सामारे जावे लागले होते. 

१)  आता मेट्रो मार्गिकेच्या कामाने गती पकडली असून लवकरच या मार्गिकेचा पहिला टप्पा ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये वाहतुकीसाठी सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

२) मेट्रो मार्गिकेचे काम आता पूर्णत्वाच्या दिशेने निघालेले असल्याने रस्तेही मोकळा श्वास घेऊ लागले आहेत.

नागरिकांना दिलासा-

१) सध्या एमएमआरसीने सीप्झ परिसरातील जवळपास २,१०२ मीटर लांबीचे रस्ते मोकळे केले आहेत. त्या खालोखाल धारावीतील १,७३० मीटर, सांताक्रुझ येथील विद्यानगरी स्थानकाजवळील १,३२५ मीटर, दादर परिसरातील १,१९६ मीटर, शितळादेवी परिसरातील १,१७० मीटर लांबीच्या रस्त्यांवरील बॅरिकेड हटविले आहेत. 

२) आता अन्य भागातील रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी एमएमआरसीने कामांना गती दिली आहे. दादर, माहीम आणि वरळी येथील सायन्स म्युझियम परिसरातील मेट्रो स्थानकासाठी अडविलेल्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. ही कामे दीड महिन्यात पूर्ण करून या रस्त्यांवर वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे एमएमआरसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पावसाळ्यात वाहन चालकांची वाहतूककोंडीतून सुटका होण्याची चिन्हे आहेत.

Web Title: roads are barricaded free in mumbai mmrc in action mode the journey of mumbaikars will be faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.