रस्ते सामसूम, पण बाजारात नेहमीसारखी धामधूम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:06 AM2021-04-07T04:06:53+5:302021-04-07T04:06:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंधेरी, साकीनाका, विद्याविहार आणि पवई परिसरात रस्ते सामसूम, पण बाजारात नेहमीसारखी धामधूम असे चित्र ...

The roads are smooth, but the market is bustling as usual! | रस्ते सामसूम, पण बाजारात नेहमीसारखी धामधूम!

रस्ते सामसूम, पण बाजारात नेहमीसारखी धामधूम!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंधेरी, साकीनाका, विद्याविहार आणि पवई परिसरात रस्ते सामसूम, पण बाजारात नेहमीसारखी धामधूम असे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले.

चांदिवलीतील दुकानदारांनी सरकारी आदेश अक्षरशः पायदळी तुडवले आहेत. मंगळवारी इथली एकूण एक दुकाने खुली होती. त्यात खेळण्यांपासून ते चष्म्याच्या दुकानांचा समावेश होता. रिअल इस्टेट एजंटांचे गाळेही याला अपवाद नव्हते. सलून, ब्युटीपार्लर, पानपट्ट्या, कपड्यांचे शोरूम अशी सगळी दुकाने पूर्वीप्रमाणे पूर्ण मनुष्यबळानिशी खुली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत. पोलिसांची गाडी रस्त्यावरून फेऱ्या मारते, परंतु दुकान बंद करण्याच्या सूचना कोणत्याही व्यापाऱ्याला केल्या जात नाहीत, असेच चित्र होते.

सर्वाधिक वर्दळीचा विभाग असलेल्या साकीनाक्यातही पहिले पाढे पंचावन्न! येथे स्टेशनरीच्या दुकानापासून ते इंग्रजी भाषा शिकवणाऱ्या क्लासपर्यंत सर्वकाही सुरू होते. पुढे मित्तल इस्टेट परिसरात कपड्याचे मॉलही उघडे होते. मरोळ, जे.बी. नगर, चकाल्यातही हीच स्थिती होती. येथील रस्ते मात्र सामसूम होते. बऱ्याच कॉर्पोरेट कार्यालयांच्या कचेऱ्या असल्यामुळे एरवी या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.

अंधेरी रेल्वेस्थानक परिसरात मात्र राज्य शासनाच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसून आला. येथील बऱ्याच गाळेधारकांनी दुकाने बंद ठेवली होती. पण फेरीवाले आणि फुटपाथवर व्यावसाय करणारे निर्बंध झुगारताना दिसून आले. व्यायामाचे साहित्य, लोखंड, पितळेच्या वस्तू यांची दुकाने सुरू होती.

विद्याविहार परिसरात पोलिसांनी सकाळी बहुतांश दुकानदारांना दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्याचे स्थानिकांनी सांगितले. परंतु, पोलिसांची पाठ वळताच स्थानकालगत फेरीवाले आणि काही गाळेधारकांनी दुकाने खुली केली. बैलबाजार, जरीमरी, सफेदपूल या भागांतील सर्व दुकाने खुली होती. येथील रस्त्यांवर मात्र नेहमीसारखी वाहतूक कोंडी नव्हती.

उच्चभ्रू परिसर अशी ओळख असलेल्या पवई-हिरानंदानीतील बहुतांश दुकानदारांनी सरकारी निर्बंधांना केराची टोपली दाखवली. चष्म्याचे शोरूम, खेळाच्या साहित्याची दुकाने, पार्लर सुरू होते. एकंदरीत मुंबईतील व्यापाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक निर्बंध आणि शासनाच्या आदेशाचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले.

-----------

...अन् दुकानदारांनी आणले सोंग

कोकणात शिमग्याला सोंग आणण्याची प्रथा आहे. पालिका आणि पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अंधेरी स्थानक आणि पवई-हिरानंदानी परिसरातील दुकानदारांनी अनोखे सोंग घेत शिमग्याची प्रचिती आणून दिली. दुकान बंद असल्याचे सांगत शटर अर्ध्यावर ओढून घ्यायचे आणि ग्राहक आला की हळूच त्याला आतून वस्तू आणून द्यायची असे ते सोंग. पण अंधेरी स्थानकाजवळ पोलिसांनी दुकानदारांची अशी सोंगे उघडी पाडत कारवाई केली.

...............

खरेदीसाठी तोबा गर्दी

लॉकडाऊनच्या भीतीने नागरिकांनी किराणा सामान भरण्यासाठी दुकानांबाहेर मोठी गर्दी केली. चांदीवली आणि पवई येथील डी-मार्टबाहेर मंगळवारी ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. या रांगांमध्ये अंतर नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले. काही जण मास्क हनुवटीखाली ओढून कोरोनाला निमंत्रण देतानाही दिसले.

Web Title: The roads are smooth, but the market is bustling as usual!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.