बंद पुलांचा ‘बेस्ट’ला आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:49 AM2019-06-12T02:49:26+5:302019-06-12T02:49:40+5:30
डिझेलचा खर्च वाढला : प्रवासी संख्येत झाली घट
मुंबई : मेट्रो रेल्वेच्या कामांचा फटका बसलेल्या बेस्ट उपक्रमाच्या अडचणीत बंद पुलांनीही भर घातली आहे. मुंबईत सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्प व रस्त्यांच्या कामांमुळे अनेक ठिकाणी बेस्ट बसगाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत. प्रवासी घटत असताना दुरुस्तीसाठी पूल बंद केल्याने बेस्ट परिवहन विभागाला लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याची नाराजी बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्यांनी मंगळवारी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळून सात पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व पुलांचे पुन्हा आॅडिट करून धोकादायक पूल तत्काळ बंद करण्यात आले. वाहन चालक, प्रवाशांची गैरसोय तर होत आहेच. याचा सर्वाधिक फटका बेस्ट उपक्रमाला बसला आहे. शहर व उपनगरातील २९ पूल धोकादायक ठरले आहेत. या पुलांवरील वाहतूक वळविण्यात आल्यामुळे बेस्ट उपक्रमालाही आपल्या मार्गात बदल करावे लागले आहेत.
बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. काही बंद केलेल्या पुलांवरून हलक्या वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. आर्थिक नुकसानीत असलेल्या बेस्ट परिवहन विभागाकडे सर्वच प्राधिकरणांचे दुर्लक्ष होत आहे.
अंधेरी गोखले पूल, ओशिवरा पूल हे बंद केल्याने बेस्ट बसना
वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. यामुळे डिझेलचा खर्च
वाढला असून प्रवासी संख्या कमी
होत आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले.
च्मेट्रो रेल्वेच्या कामामुळे अनेक ठिकाणी बेस्ट बसमार्ग वळविण्यात आले आहेत. यामुळे त्या मार्गांवरील प्रवाशी वर्गात घट झाली आहे. याबाबत बेस्ट समितीमध्ये सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बेस्ट उपक्रमाला होणारे नुकसान भरुन मिळावे, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य अनिल कोकीळ यांनी केली आहे.
च्अंधेरी येथील गोखले पुलाचे काम झाल्यानंतर काही गाड्यांसाठी हा पूल खुला करण्यात आला. बेस्ट बसगाड्यांसाठीही गोखले पूल लवकरच खुला करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आठवड्याभरात गोखले पुलावरून बसगाड्या सुरू करण्यात येतील, असे बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले.