Join us  

गिरणगावचे रस्ते गणेशभक्तांनी फुलू लागले

By admin | Published: September 11, 2016 3:13 AM

मुंबई शहर-उपनगरांत शनिवारी लाडक्या गौरी-गणपतीला साश्रू नयनांनी गणेशभक्तांनी निरोप दिला. त्यानंतर सायंकाळी शहर-उपनगरांतील अनेक गणेशभक्तांनी गिरणगावात सार्वजनिक

मुंबई : मुंबई शहर-उपनगरांत शनिवारी लाडक्या गौरी-गणपतीला साश्रू नयनांनी गणेशभक्तांनी निरोप दिला. त्यानंतर सायंकाळी शहर-उपनगरांतील अनेक गणेशभक्तांनी गिरणगावात सार्वजनिक बाप्पांच्या दर्शनासाठी गर्दी केली. शनिवारी गौरी-गणपती विसर्जनानंतर वीकेण्डचा ‘मुहूर्त’ साधून अनेकांनी सहकुटुंब, मित्रपरिवारासहित सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी रीघ लावली.लालबाग येथील प्रमुख आकर्षण असणाऱ्या लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तांनी मोठमोठ्या रांगा लावल्या. त्याचप्रमाणे गिरणगावातील गणेशगल्ली, चिंतामणी, तेजुकाया, रंगारी बदक चाळ, काळाचौकीचा महागणपती अशा विविध सार्वजनिक बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी सायंकाळनंतर गिरणगावातील रस्ते गणेशक्तांनी फुललेले पाहायला मिळाले.गणेशोत्सवाच्या काळात लालबाग, करीरोड, परळ परिसरात रात्रंदिवस वेगळीच ऊर्जा दिसून येते. या परिसरात लहानग्यांपासून आजी -आजोबांपर्यत सर्व वयोगटातील गणेशभक्त तितक्याच उत्साहाने सहभाग घेताना दिसून येतात. परळ नरेपार्क येथील सार्वजनिक बाप्पाच्या परिसरात गेली अनेक वर्ष जत्रेचे आयोजन केले जाते. या जत्रेतील अनेक पारंपरिक खेळांसोबत येथील आकाश पाळणाही गणेशभक्तांचे आकर्षण ठरत आहे. गिरणगावातील प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या वेगळेपणामुळे प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी उंच गणेशमूर्ती तर काही ठिकाणी असणारे चलचित्रांचे देखावे पाहण्यासाठी गणेशभक्त आवर्जून गर्दी करत आहेत. (प्रतिनिधी)