मुंबई - राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली. यात फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना देण्यात आलेली एक्स सुरक्षा वाढवून वाय प्लस देण्यात आली. त्यावरून विरोधकांनी टीकास्त्र सोडलं होतं. या वादात आता भाजपाचे मोहित कंबोज यांनी उडी घेतली आहे.
मोहित कंबोज यांनी यावरून ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. कंबोज यांनी ट्विट करत म्हटलंय की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडताच ३०-३० मिनिटे मुंबईतले रस्ते ब्लॅाक केले जात होते. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनाही Y Plus सुरक्षा आहे. त्यावेळी असेच रस्ते बंद केले जात होते मात्र यावर कोणीच काही बोललं किंवा लिहिलं नाही असं अप्रत्यक्षपणे त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
काय असते Y प्लस सुरक्षा?Y+ सुरक्षा मिळाल्याने संबधित अति महत्त्वाच्या व्यक्ती सुरक्षेसाठी एस्कॉर्ट वाहनासह ५ पोलीस कर्मचारी चोवीस तास तैनात असणार आहेत. मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाने या संदर्भात वाहतूक विभागाला आवश्यक सूचना दिल्या जातात. ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन प्रवास करताना पायलट वाहन म्हणून काम करते. ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनाची सुविधा घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीलाच दिली जाते अशी माहिती पोलिसांनी दिली.
अमृता फडणवीसांनी नाकारली सुविधामहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y+' सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र "मला मुंबईच्या सामान्य नागरिकांप्रमाणे जगण्याची इच्छा आहे. मला पायलट वाहन देऊ नका अशी विनंती अमृता फडणवीसांनी केली.
देवेंद्र फडणवीसांनीही VIP कल्चरला फाटा दिलानुकतेच देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील कार्यक्रम आटोपून विमानाने दिल्लीसाठी रवाना झाले होते. ते नागपूर विमानतळावर पोहचले असता त्यांनी व्हीआयपी असल्याचा फायदा घेत सरळ निघून न जाता सामान्य प्रवाशांप्रमाणे लाईनमध्ये लागून बोर्डींग पास घेणे पसंत केले. फडणवीसांचा हा साधेपणा त्यावेळी विमानतळावर उपस्थित असलेले प्रवासी व विमानतळावर कार्यरत कर्मचाऱ्यांनाही भावला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"