पनवेल : पनवेल शहरातील मुख्य रस्त्यांबाबत पनवेल नगरपालिकेने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. या करिता महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानात प्रशासनाने भाग घेऊन एकूण १४ किमी अंतराच्या १६ रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तांत्रिक मंजुरीसाठी ही फाईल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आली आहे. या विभागाच्या मुख्य अभियंत्याने तांत्रिक सहमती अहवाल नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडे सादर केला आहे. हा रस्ते विकास प्रकल्प १०३ कोटींचा असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.मुंबई आणि पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पनवेल शहराची महानगराच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. या परिसरात येणारे विविध प्रकल्प त्याचबरोबर वाढते नागरीकरण यामुळे शहराचा झपाट्याने कायापालट झाला आहे. या व्यतिरिक्त तालुक्याचे ठिकाण आणि सर्व शासकीय कार्यालये शहरात असल्याने दररोज या ठिकाणी मोठी वर्दळ असते. पनवेलमधील वाढती लोकसंख्या आणि नागरिकरणाचा विचार करता या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. २००६ नंतर शहरातील भुयारी गटार योजनेला अधिक चालना मिळाली. त्याचबरोबर इतर पायाभूत सुविधांवरही भर देण्यात येत आहे. त्यानंतर २००९ पासून शहरातील इन्फ्रास्ट्रक्चरकडे अधिक लक्ष पुरवण्यात आले आहे. नगराध्यक्ष होण्याच्या अगोदर आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या जाहिरनाम्यात पनवेल शहरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी गेल्या काही वर्षात शासन पातळीवर पाठपुरावाही केला. शिवाजी चौक ते पंचरत्न हॉटेल मार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्याचबरोबर ठाणा नाका रोडचे सिमेंटीकरण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु आहे. (प्रतिनिधी)
पनवेलमधील रस्ते चकाकणार
By admin | Published: June 13, 2014 11:21 PM