शैलेश चव्हाण
तळोजा : तळोजा औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्यांची व बायपास रस्त्याची चाळण झालेली असून याकडे एमआयडीसी व सिडको यांच्या कडून सपशेल डोळेझाक होताना दिसत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत नावडे उड्डाणपुलावरून तळोजा एमआयडीसीमध्ये प्रवेश करताना असलेल्या उड्डाणपुलावर मोठमोठे खड्डे वाहनचालकांच्या जीवावर बेतत असून याच मार्गावरून या भागातील एमआयडीसी अधिकारी देखील प्रवास करत असून देखील येथील खड्डे जैसे थे असल्याने कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या मार्गावर खड्ड्यांचे सावट कायम असल्याने रोडपाली फुडलँड जवळून बायपास ने जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा तर या रस्त्याची यापेक्षा भयानक परिस्थिती आहे, हा रास्ता सिडकोच्या देखरेखेखाली येत असल्याने याची डागडुजी सिडको करते. मात्र, पावसात रस्त्यावर ओतण्यात येणारी खडी कम रेती वाहून गेल्याने गुढघाभर खड्डे सध्या या रस्त्यावर पडलेले आहेत.एमआयडीसी अभियंता दीपक बोबडे पाटील यांनी नावडे पुलावरील खड्ड्यांबाबत निविदा काढल्याचे सांगितले असून पावसात काम करण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले आहे. तर रोडपाली बायपास रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सिडकोचे उपअभियंता संजय पाटील यांनी या मार्गावर खडी टिकूशकत नाही, टाकलेली खडी वाहून जातात लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात कारखाने असून या कारखान्यांमध्ये येथील स्थानिक कर्मचारी कामानिमित्त या मार्गाचा वापर करून ये-जा करत असतात. बºयाच वेळा मोटारसायकल वरून ये-जा करत असताना या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मात्र, कोणत्याही प्रकारे याचे गांभीर्य ना बाळगता या महत्त्वपूर्ण रस्त्याकडे डोळेझाक केली जात आहे. तळोजातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला जातो. मात्र, या ठिकाणी असलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सर्वच मूग गिळून गप्प आहेत. नावडे पुलावरील खड्ड्यांबाबत निविदा काढलेली आहे. लवकरच याबाबत उपाययोजना केली जाईल.- दीपक बोबडे पाटील,कार्यकारी अभियंता,तळोजा एमआयडीसी
रोडपाली फुडलँड येथून जाणाºया रस्त्यावर पडलेले खड्डे याबाबत लवकरच उपाययोजना केली जाईल, या ठिकाणी पाण्याला जागा नसल्याने पाणी साचते व त्यामुळे येथील खड्ड्यांवर कायमचा उपाय करण्यात अडथळा येत आहे, तरीही या खड्ड्यांच्या बाबत उपाययोजना केली जाईल .- संजय पाटील,सिडको उपअभियंता