रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:06 AM2021-05-18T04:06:14+5:302021-05-18T04:06:14+5:30

लोकलवर पडल्या झाडाच्या फांद्या; दहिसर स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पत्रा उडून आला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबईत सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार ...

Roads, rail traffic disrupted | रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत

रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Next

लोकलवर पडल्या झाडाच्या फांद्या; दहिसर स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पत्रा उडून आला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबईत सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत असल्याने मुंबईच्या जीवनवाहिनीला मोठा फटका बसला. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर ते विक्रोळीदरम्यान धीम्या मार्गांवर ओव्हरहेड वायर आणि एका लोकलवर झाडाच्या फांद्या पडल्या आहे. परिमाणी डाउन मार्गावरील वाहतूक रखडली. धीम्या मार्गांवरील वाहतूक जलद मार्गांवरून वळविण्यात आली. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या अभियांत्रिक पथकाने लोकलवर पडलेल्या झाडाच्या फांद्या हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करून सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी हे काम पूर्ण केले. दरम्यान, संध्याकाळनंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू झाली. तर पश्चिम रेल्वेच्या दहिसर स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पत्रा उडून आला होता. मोटरमनने गाडी थांबवून पत्रा बाजूला केला आणि वाहतूक सुरू केली. सायंकाळी उमरोली स्थानकाजवळ पत्रा ओव्हरहेड वायरवर पडला होता, मात्र ताे काढण्यात आला. तर चर्चगेट, मरिन ड्राइव्ह स्थानकाजवळ मोठे झाड पडले. ते हटवण्यात आल्यानंतर काही वेळाने वाहतूक पूर्ववत झाली. वादळासह पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा धीम्या गतीने धावत होत्या. त्यामुळे शेकडो लोकल गाड्यांना लेटमार्क लागला.

* मालाड, दहिसर, अंधेरी सबवेवरील वाहतूक बंद

चक्रीवादळामुळे मालाड, दहिसर आणि अंधेरी सबवेवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. दहिसर आणि अंधेरी सबवे सायंकाळी उशिरा खुला करण्यात आला होता. वांद्रे-वरळी सी लिंक पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. वाय. एम. मार्ग येथे रस्त्याच्या मधोमध पडलेले झाड पायधुनी पोलीस, मोबाइल व्हॅन २च्या जवानांनी बाजूला केले व नागरिकांसाठी वाट मोकळी केली.

........................................

Web Title: Roads, rail traffic disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.