लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरातील रस्ते आणि रेल्वे मार्गावर प्रवास करणे धोक्याचे बनत आहे. शनिवार आणि रविवारी या दोन दिवसांत विविध अपघातांमध्ये तब्बल २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अपघातात शनिवारी १५ आणि रविवारी रस्ते अपघातात पश्चिम उपनगरांतील ५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. उपनगरीय रेल्वे मार्गावर सहा दिवसांत ६१ प्रवासी मरण पावले आहेत. अतिघाईत रेल्वे रूळ ओलांडणे, स्टंटबाजी यामुळे प्रवासी मृत्युमुखी पडत आहेत. रेल्वे मार्गाच्या मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरवरील अपघातांची आकडेवारी प्रवाशांची चिंता वाढवणारी आहे. शनिवारी मध्य रेल्वे मार्गावर तब्बल १५ प्रवाशांना प्राणास मुकावे लागले. कुर्ला स्थानकात ५ तर कल्याण स्थानकात ३ प्रवाशांचा अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. ‘अति घाईच प्रवाशांना संकटात नेते’, असे रेल्वे अपघातात दिसून येत आहे. १ ते ६ मे दरम्यान तब्बल ६१ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे.वारंवार प्रवाशांना सूचना देऊनही रेल्वे रूळ ओलांडणे, लोकलच्या दरवाजावर लटकणे, स्टंटबाजी करणे सुरूच असल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
रस्ते, रेल्वेमार्ग बनले मृत्यूचे सापळे
By admin | Published: May 09, 2017 1:44 AM