तात्पुरती मलमपट्टी केल्याने रस्ते पुन्हा उखडले!
By admin | Published: July 4, 2014 02:02 AM2014-07-04T02:02:36+5:302014-07-04T02:02:36+5:30
नागरिकांच्याच पैशातून मुलुंड परिसरातील रस्त्यांची मलमपट्टी करण्यात आली खरी; मात्र ही मलमपट्टी तात्पुरती स्वरूपाची असल्याने पहिल्या पावसातच येथील रस्ते पुन्हा एकदा उखडले
मुंबई : नागरिकांच्याच पैशातून मुलुंड परिसरातील रस्त्यांची मलमपट्टी करण्यात आली खरी; मात्र ही मलमपट्टी तात्पुरती स्वरूपाची असल्याने पहिल्या पावसातच येथील रस्ते पुन्हा एकदा उखडले आणि नागरिकांचा संताप अनावर झाला.
जून महिन्यात पडणारा पाऊस जुलैच्या पूर्वार्धात सुरू झाला; मात्र नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून महानगरपालिकेने शहर आणि उपनगरातील रस्त्यांची कामे हाती घेतली. तशी ती मुलुंडमध्येही घेण्यात आली. या रस्त्यांच्या कामांतर्गत सरोजिनी नायडू रोड, देवीदयाल रोड येथील रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात आले. तर उर्वरित भागांतील रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. या रस्त्यांचा अशोकनगर, डम्पिंग रोड, चिखलवाडी आणि तांबेनगरमधील नागरिकांना मोठा फायदा होत आहे. शिवाय मुलुंड स्थानक आणि चेकनाका परिसरात जाण्यासाठी या रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी येथील रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले होते. मात्र पहिला पाऊस आला आणि पहिल्या पावसातच येथील रस्ते वाहून गेले. येथील रस्त्यांवर एकसमान काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. परिणामी ठिकठिकाणी पाणी साचले तर पेव्हर ब्लॉकचे कामही व्यवस्थित झाले नसल्याने पहिल्या पावसात दैना उडाली.
दरम्यान, यावर स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारणा करण्यात आली असता हे काम तात्पुरत्या स्वरूपाचे करण्यात आल्याचे उत्तर मिळाले. (प्रतिनिधी)