मुंबई - जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील हस्तपोखरी व कर्जत येथील गावकऱ्यांना मॉडेल रस्त्याचे स्वप्न दाखवून बोगस रस्ता तयार करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी या रस्त्याची पोलखोल करून गुत्तेदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही उघडे पाडले. गावकऱ्यांनी रस्त्यात केलेल्या बोगसगिरीचा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर टीका करत खिल्ली उडवली आहे.
महाराष्ट्र सरकारने "भ्रष्टाचारी तंत्रज्ञानात" अल्पावधित मोठी प्रगती केली आहे. सत्ता आल्यानंतर अवघ्या १० महिन्यात जगात पहिल्यांदा "फोल्डिंगचे रस्ते" बनवण्याचं तंत्रज्ञान यांनी विकसित केलं आहे. हे असंच चालू राहिलं तर काही दिवसातच आपल्याला घडी घालून ठेवायचे रस्ते देखील पाहायला मिळतील, असा मला विश्वास आहे, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जालन्यातील रस्ते प्रकरणाचा व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली. तसेच, राज्य सरकारच्या कामाची खिल्लीही उडवली आहे.
अंबड तालुक्यातील कर्जत ते हस्तपोखरी रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. या रस्त्यासाठी गावकऱ्यांना लोकप्रतिनिधींकडे वारंवार चकरा माराव्या लागल्या. त्यानंतर मंजूर झालेला हा रस्ता पूर्ण होण्यास मोठा विलंब लागला. जर्मन तंत्रज्ञानाद्वारे जिल्ह्यातील पहिला रस्ता म्हणून कर्जत - हस्तपोखरी या रस्त्याची निर्मिती करण्यात येणार, असा गाजावाजा करण्यात आला होता. ९.३ किलोमीटर अंतराच्या या रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर झाल्याने हा रस्ता जर्मन तंत्रज्ञान वापरून बनविण्यास सुरुवातही झाली. पहिल्या टप्प्यात या रस्त्यावर खडी टाकून त्याची दबाई करण्यात आली. त्यानंतर दोन महिने काम बंद राहिले.
तेव्हापासून या रस्त्याकडे गुत्तेदार फिरकला नाही. वेळेत डांबरीकरण न झाल्याने रस्त्यावर टाकलेली खडी निखळून बाहेर पडली होती. नागरिकांची ओरड होताच थातूरमातूर पद्धतीने हा रस्ता तयार करण्यात आला. हे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी रस्त्याची पोलखोल केली. निकृष्ट रस्त्यावर पॉलिथीन अथरून डांबर टाकण्यात आल्याचे गावकऱ्यांनी उघड केले. या प्रकारामुळे गुत्तेदारासह या रस्त्याची गुणवत्ता तपासणारे अधिकारीही उघडे पडले आहेत. आता यावर जिल्हा प्रशासनाकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.