आईसफ्लेक्स न वापरताच रस्ते बांधले; कॅगच्या अहवालातून माहिती उघड, हे आहेत ते ६ कंत्राटदार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:57 AM2023-03-30T11:57:06+5:302023-03-30T11:57:11+5:30
रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी मोठ्या कंत्राटदारांना हे काम दिले जात आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव, निधीच्या खर्चात अनियमितता यावर कॅगने बोट ठेवले असतानाच कंत्राटदारांच्या खर्चात बचत व्हावी यासाठी रस्ते काँक्रिटच्या कामात आईसफ्लेक्स न वापरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहा कंत्राटदारांनी काँक्रिट रस्ते बांधकामात आईसफ्लेक्स न वापरल्याची माहिती कॅगने दिली आहे.
मुंबईत सुमारे २ हजार किमी लांबीचे डांबरी रस्ते असून या रस्त्यांवर दर पावसाळ्यात खड्डे पडत असल्याने मुंबई महापालिकेने या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील सुमारे १ हजार किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णही झाले आहे. उर्वरित रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहेत.
रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी मोठ्या कंत्राटदारांना हे काम दिले जात आहे. मात्र खर्चात बचत व्हावी यासाठी सहा कंपन्यांनी काँक्रिटच्या रस्ते बांधकामात आईसफ्लेक्स न वापरल्याची माहिती कॅगने उघडकीस आणली आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
हे आहेत ते सहा कंत्राटदार
नवदीप कन्स्ट्रक्शन कंपनी, एम इ इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, एन ए कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व व्ही. एन. सी. इन्फ्राप्रोजेक्ट्स, एम. इ. इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि एन. सी. इंटरप्रायझेस, प्रगती इंटरप्रायझेस, कोणार्क स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड.
शहानिशा करावी
‘कॅग’ने सादर केलेल्या अहवालात काँक्रिटिकरणाच्या कामात मायक्रो सिलिका आणि आईस फ्लेक्स न वापरताच काम करण्यात आले. त्यामुळे कंत्राटदारांना ५.३ कोटींचा लाभ मिळाला आहे. त्यावर पालिकेचे असे म्हणणे आहे की, चालू कंत्राटात अतिरिक्त काम करून घेण्यात आल्यामुळे या कामाचा दर्जा तपासला गेला नाही, असे असले तरी मुंबईत नव्याने बांधण्यात येत असलेल्या काँक्रिटच्या रस्त्यात मायक्रो सिलिका आणि आईस फ्लेक्स कंत्राटदारांनी वापरले की नाही त्याची शहानिशा पालिकेने करावी अशी मागणी मुंबईकरांकडून केली जात आहे.