Join us

महाड औद्योगिक वसाहतीमधील पथदिवे बंद

By admin | Published: May 23, 2014 3:59 AM

महाड औद्योगिक वसाहतीमधील पथदिव्यांचे काम काही महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करुन मार्गी लावण्यात आले होते

बिरवाडी : औद्योगिक वसाहतीमधील अतिरिक्त एमआयडीसी रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने या ठिकाणावरुन ये-जा करणारे नागरिक, कामगार यांची प्रचंड गैरसोय होत असून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाड औद्योगिक वसाहतीमधील पथदिव्यांचे काम काही महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करुन मार्गी लावण्यात आले होते. त्यामध्ये हायमास्टसारख्या उच्च प्रतिच्या पथदिव्यांचा देखील समावेश करण्यात आला होता. मात्र या पथदिव्यांचे मेंटेनन्स व्यवस्थितरीत्या होत नसल्याने बहुतांशी पथदिवे बंद असल्याचे आढळून आले आहे. महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाकडून या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीकरिता ठेकेदार नेमण्यात आला असून सदर ठेकेदाराला देखभाल दुरुस्तीच्या कामाकरिता वर्षाकाठी काही लाखो रुपयांचे बिल अदा करण्यात येते, असे असताना प्रत्यक्षात मात्र विद्युत पथदिवे बंद असतात. त्यामुळे रात्रपाळीकरिता कामावर ये- जा करणार्‍या कामगारांची वाट बिकट बनली असून अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाचे इलेक्ट्रीक इंजिनिअर एम. के. राजू यांच्याशी संपर्क साधला असता टायमरला बिघाड झाल्याने पथदिवे काही दिवस बंद होते, मात्र तांत्रिक बिघाड दूर केल्याने दिवे पुन्हा प्रकाशित होतील व लोकांची गैरसोय दूर होईल अशी माहिती दिली.