Join us

मुसळधार पावसामुळे रस्त्यांची पार दुर्दशा

By admin | Published: July 18, 2014 12:37 AM

गेले दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने वसई-विरार शहरी व ग्रामीण भागातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

वसई : गेले दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने वसई-विरार शहरी व ग्रामीण भागातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना आपली वाहने हळुवार चालवावी लागत आहेत. नालासोपारा शहरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.वसई-विरार परिसरात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक झाले आहेत, कारण या सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. महानगरपालिकेने यंदा भूमिगत गटाराचे काम केले असले तरी पावसाळी पाण्याचा निचरा मात्र होऊ शकला नाही. त्यामुळे नालासोपारा पूर्व भागातील आचोळे, तुळींज व अन्य भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिक व व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. दरवर्षी या भागात पाणी साचून किमान ३ दिवस दैनंदिन व्यवहार बंद पडतात. परंतु त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून महानगरपालिकेने यंदाही उपाययोजना केली नाही. ग्रामीण भागातही नाळे गावात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. गास-चुळणा दरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे या रस्त्यावरची वाहतूकही थंडावली आहे.