मुंबई : संविधानाने मताधिकार दिलेला असताना तो बजावता येत नव्हता. मतदार कार्ड कसे मिळवायचे याची माहितीही त्यांना नव्हती. मतदार कार्ड मिळवण्यासाठी तर काही लोकांनी दलालांना ३०० ते ४०० रुपये दिले. मात्र त्यांचे काम झाले नाही, अशा गावकऱ्यांच्या हाकेला मुंबईकर तरुण धावून आले.
गावातल्या तरुणाईला सोबत घेत स्वत: वेगवेगळ्या योजनांची माहिती संबंधितांना उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे गावामध्येच विनामूल्य मतदार नाव नोंदणी करून दिली आणि आता आगामी निवडणुकीत पालघरमधील गावकऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
मुंबईतील पुकार संस्था २०१४ सालापासून पालघर या आदिवासी जिल्ह्याच्या विकासासाठी गाव पातळीवर काम करत आहे. एप्रिल २०२२ पासून संस्थेचे काम पालघर जिल्ह्यामधील विक्रमगड तालुक्यामध्ये सुरू झाले.
नागरिकांना सरकारी योजनांची माहिती व्हावी आणि लाभ मिळावा यासाठी तसेच गावांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने संस्थेने स्थानिक लोकशाहीचे बळकटीकरण हा प्रकल्प २५ गावांमध्ये सुरू केला आहे.
प्रकल्पांतर्गत गावांमधील तरुण-तरुणी यांना सोबत घेऊन त्यांना विविध प्रशिक्षणे देऊन ग्रामसाथीची एक सक्षम टीम तयार केली, अशी माहिती प्रकल्प संचालक किरण सावंत यांनी दिली.
ऑनलाइन नोंदणी :
गावातील ज्या तरुणी-तरुणांना स्वतःही नोंदणी करता येईल त्यांना ऑनलाइन मतदार नोंदणी करायला शिकवले. ज्या गावकऱ्यांना मदतीची गरज होती, अशा गावकऱ्यांसाठी गावपातळीवर कॅम्प आयोजित करून अनेकांची मतदार म्हणून ऑनलाइन नोंदणी करवून दिली. ऑक्टोबर २०२३ ते डिसेंबर २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये टीमने एकूण २३५४ व्यक्तींची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करवून त्यांना त्यांचे मतदार कार्ड डाउनलोड करून दिले.
घरांचे सर्वेक्षण :
पुकारचे ग्रामसाथी पाड्यावर जाऊन घरांचे सर्वेक्षण करतात. सर्वेक्षणामधून गरजू कुटुंबे लक्षात येतात. त्यांना सरकारी योजनांची माहिती दिली जाते. त्यांचे कुटुंब योजनेच्या पात्रता निकषामध्ये बसत असेल तर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्या कुटुंबाला पुकार संस्थेमार्फत अर्ज प्रक्रियेत साहाय्य केले जाते.
लोकांना मताधिकार :
संस्थेने ग्रामपंचायतींच्या सहकार्याने मतदार नोंदणीचे काम सुरू केले. सदस्यांनी घरोघरी जाऊन मताधिकार समजावून सांगितला. मतदार नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करता येते हे दाखवले.