Join us

निवडणूक तपासणीच्या बहाण्याने लुटारू झाले सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:56 AM

पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाची लूट

- मनीषा म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस, निवडणूक अधिकाऱ्यांसह आयकर विभागाकडून मुंबईत ठिकठिकाणी तपासणी सुरु आहे. याच तपासणीचा फायदा घेत लुटारु तोतया पोलीस बनून व्यावसायिकांना गंडवत असल्याचा धक्कादायक प्रकार एमआरए मार्ग परिसरात घडला आहे. यात, ७१ वर्षीय वृध्द व्यावसायिकाला पोलीस असल्याचे सांगून, तपासणीच्या बहाण्याने त्यांच्याकडील ५ लाखांची रोकड घेत लुटारु पसार झाले. याप्रकारामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. याप्रकरणी गुजरातमधील लुटारुचा हात असल्याची माहिती समोर येत असून, त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

मुंबई सेंट्रल परिसरात राहणारे ७१ वर्षीय शब्बीर अन्वर काझी यांचा परफ्युम मन्युफक्चर अ‍ॅण्ड एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या मुलाचाही हाच व्यवसाय असून तो दुसरीकडे राहतो. १० तारखेला मुलाकडे जमा झालेली व्यवहाराची ५ लाखांची रोकड त्यांनी येताना सोबत घेवून येण्यास सांगितले. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास साबु सिध्दीकी रोड येथील मुलाच्या घराजवळून रोकड घेत, ते दुचाकीवरुन घरी जाण्यासाठी निघाले. त्यांनी पैसे डिक्कीत ठेवले. कर्णाक बंदर ब्रीज जवळ पोहचताच दुकलीने पावणेसहाच्या सुमारास त्यांना अडविले.’हम पुलीस वाले है. इलेक्शन की वजह से यहा गाडी चेकींग चल रहा है’ म्हणत डिक्की उघडण्यास सांगितले. ते डिक्की खोलण्यास तयार नसल्याने त्यांना गर्दीतून थोडे पुढे नेत मनीष मार्केट परिसरात आणले. त्यांच्याकडील चावी घेत डिक्की उघडली. त्यातील पाच लाख रुपये ताब्यात घेत यावरुन त्यांना उलट सुलट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील पैसे घेत ते पसार झाले. ही बाब काझी यांच्या लक्षात येताच त्यांनी घर गाठून मुलाला घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार, दोघांनी एमआरए मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून, ठोस पुरावे हाती लागले आहेत. यात गुजरात कनेक्शन समोर येताच पोलीस तपास पथक गुजरातला रवाना झाले आहे.

टॅग्स :चोरीविधानसभा निवडणूक 2019