मंगेश कराळे -नालासोपारा - घरफोडी व चोरी करणाऱ्या चार आरोपींच्या टोळीला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या चारही आरोपींकडून १३ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती मंगळवारी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपींच्या मिळालेल्या माहितीवरून आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून आरोपी शमीम ऊर्फ राजा अन्सारी, बालकराम ऊर्फ मुन्ना विश्वकर्मा, वलीऊल्ला चौधरी आणि चाँद ऊर्फ हामीद रईन या चारही आरोपींना गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपास केला. या चारही आरोपींनी वालीव पोलीस ठाण्याचे हद्दीत व निर्मळनगर पोलीस ठाणे येथे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यांच्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणून गुन्हयात चोरीस गेलेली दुचाकी, रोख रक्कम, कंपनीतील लोंखडी व स्टील पार्ट, सोन्याचे व चांदीचे दागिने, वाहनाच्या बॅटऱ्या व चाके, मोबाईल असा एकुण ४ लाख ६३ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, सचिन दोरकर, किरण म्हात्रे, राजेंद्र फड, पोलीस नाईक बाळु कुटे, सतिष गांगुर्डे, पोलीस अंमलदार गजानन गरीबे, सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी यांनी पार पाडलेली आहे.