दरोडा टाकणारा ‘कटर’ शस्त्रास्त्रांसह ताब्यात; एमएचबी कॉलनी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 10:47 AM2023-09-03T10:47:38+5:302023-09-03T10:48:08+5:30
कोयत्याने वार करत लुबाडणाऱ्या टोळीच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
मुंबई : कोणतेही टाळे असो ते अवघ्या काही सेकंदांत तोडून घरफोडी करत पसार होणाऱ्या सराईत हर्षित द्वारकाप्रसाद हरिजन उर्फ कटर (२२) याच्या मुसक्या आवळण्यात एमएचबी कॉलनी पोलिसांना यश आले. तसेच अन्य आरोपींचाही यात समावेश आहे. जे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तेथे आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
एमएचबी कॉलनी पोलिसांच्या हद्दीत १ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काहीजण सिल्वर कापड दुकानाच्या पुढे असलेल्या आयसी कॉलनी कन्स्ट्रक्शन साइटजवळ हत्यार घेऊन लुटमारीसाठी आले आहेत. त्यानुसार याची माहिती त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर आणि निरीक्षक शीतल पाटील यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत पवार आणि बोंबे यांनी पथकाच्या मदतीने पाच आरोपींना ताब्यात घेतले. यात कटरसह रोहित धोत्रे (२२), राजेंद्र उर्फ राजा प्रकाश जाधव (२६), विवेक पाटोळे (२२) आणि गोलू हरिजन (२४) यांचा समावेश आहे.
कोयत्याने वार करणारा सापडला
कोयत्याने वार करत लुबाडणाऱ्या टोळीच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. यात अनिल राजू चौहान उर्फ डिमा या थेट कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीचा समावेश आहे. तसेच त्याचे साथीदार इम्रान शेख या गुन्ह्यातील सूत्रधारासह टेम्पोचालक फरमान शेख, रिक्षाचालक, कुंदन झा आणि साथीदार कासीम अन्सारीलाही गजाआड करण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, कोयता तसेच रक्कमही जप्त केल्याचे कुडाळकर यांनी सांगितले.