Join us

मुंबईकरांच्या खिशावर दरोडे; महापालिका सांगते ७० रुपये घ्या, पार्किंगवाले घेतात कुठे १५० तर कुठे ३००

By मनीषा म्हात्रे | Published: January 04, 2024 2:09 PM

... मात्र, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, हा प्रश्न आहे. 

मुंबई : पार्किंगची समस्या गंभीर होत असताना पे अँड पार्कच्या नावाखाली मुंबईकरांच्या खिशावर करोडो रुपयांचे दरोडे टाकले जात आहेत. लोकमतने क्रॉफर्ड मार्केट परिसरात रिॲलिटी चेक केले. त्या एका ठिकाणी रोज लाखभर रुपयांची कमाई होत असल्याचे समोर आले.. मुंबईत पे अँड पार्कची सुविधा अनेक ठिकाणी आहे. सगळ्यांचा हिशोब लावला तर फुकटच्या जागेवरून वर्षाकाठी करोडो रुपये कमावणारी टोळीच कार्यरत असल्याचे अधिका-यांनी खासगीत सांगितले. मात्र, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, हा प्रश्न आहे. 

चारचाकी वाहन पार्क करण्यासाठी पालिकेने दर ठरवून दिले आहेत. मात्र गाडी, गाडीचे मालक व उपलब्ध जागा पाहून कार पार्किंगचे दर प्रत्येकाला वेगळे लावतात. पार्किंगमधील मुले वेगवेगळे दर लावतात. नियमानुसार एक तासासाठी ७० रुपये असताना कोणाकडून १५० तर कोणाकडून ३०० रुपयेही वसूल केले जातात. एकट्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात रोज ५०० हून अधिक वाहने पार्क केली जात असतात. त्यातून दर दिवशी कमीत कमी ७५ हजार ते १ लाख रुपयापर्यंत कमाई होते असे तिथे काम करणाऱ्या मुलांचेच म्हणणे होते. आम्हाला गाडी नीट पार्क करावी लागते. चाव्या सांभाळाव्या लागतात, असे सांगत ते त्याचे समर्थन करतात. यातून महापालिकेच्या तिजोरीची आणि नागरिकांची दिवसाढवळ्या लूट सुरू असल्याचे अधोरेखित होते. यात सगळ्यांनाच काही ना काही द्यावे लागते म्हणून एवढे पैसे घ्यावेच लागतात असेही काही मुलांनी सांगितले.

गाडी पार्क करणाऱ्या सोबत क्रॉफर्ड मार्केटमध्ये झालेला संवाद असाप्रतिनिधी : पार्किंगचे चार्जेस किती आहे?कामगार : मॅडमजी एक घंटे का १५० रुपये लगेगा...प्रतिनिधी : अरे, बोर्ड पे तो ७० रुपये है?कामगार : चावी संभालना पडता है, गाडी संभालना पडता है. कभी चावी गूम हो जाती है. तो हमेही पैसे देने पडते है. १५० ही देना पडेगा..प्रतिनिधी : पावती दो गे नाकामगार : पावती नही मिलेगी. उसमे बिल अमाऊंट नही है. सिर्फ नंबर रहेगा. मॅडमजी यहा ऐसेही चलता है. कितनी गाडी है और कब लगाना.प्रतिनिधी : थर्टी फर्स्ट को पार्टी हे. एक साथ २५ गाडीया रहेगी. जगा तो है ना. गाडी कहा पार्क करोगे.कामगार : गाडी दुसरी जगह पार्क होता है. है एक जगह.प्रतिनिधी : चलान तो नही आयेगा ना..?कामगार : उसका टेन्शन मत लो. सब हमारीही जगह है...

वाझेची कारही येथेच पार्कप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन याच्या हत्याप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला एनआयएकडून अटक करण्यात आली होती. याच गुन्ह्याशी संबंधित वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार येथील पार्किंगमधून गुन्हे शाखेने ताब्यात घेतली होती. त्यामध्ये दोन लाखांची रोकड आणि पैसे मोजण्याचे मशीनही जप्त करण्यात आले होते.

असेही प्रकारमार्च, २०२३ - बोरिवली पश्चिमेकडील एलटी रोड येथील पे अँड पार्क याठिकाणी ॲड अश्विन मेहता (७०) यांच्या नातवाने इलेक्ट्रिक स्कूटी पार्क केली होती. त्यातील बॅटरी चोरी करण्यात आली आणि या पार्किंगच्या अटेंडंटला विचारणा केल्यावर त्याने हात वर केले.एप्रिल, २०२३ - बोरिवली पश्चिमेच्या चंदावरकर रोडवर सुरेश बार अँड रेस्टॉरंटच्या बाहेर अमित सेदानी यांनी त्यांची दुचाकी पार्क केली. त्यांना आर/सेंट्रल वॉर्ड, हरी ओम एंटरप्रायझेस नावाने पावतीही दिली गेली. त्यानी पे अँड पार्कचा साईनबोर्ड पाहिला होता ज्यावर नियम आणि पार्किंगचे दर होते. मात्र अनधिकृत पार्किंग केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावला तेव्हा सदर पे अँड पार्कचे कंत्राट कधीच संपल्याचे नंतर उघड झाले.

कारवाईनंतरही वसुली भरमसाट-  काही दिवसांपूर्वीच येथे पार्किंगसाठी दिलेले वाहन थेट सीएसएमटी स्थानकासमोर नो पार्किंगमध्ये पार्क केले गेले होते. त्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत दंड आकारला. वाहन मालकाला ई चलान आले. -  पोलिसांनी वाहन मालकाकडे चौकशी करताच त्यांनी वाहन पार्किंगसाठी दिले असल्याची बाब समोर आली. अखेर वाहतूक पोलिसांनी सरकारतर्फे आझाद मैदान पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करुन सुपरवायझर मोहसीन हसन शेख (३९) विरुद्ध गुन्हा नोंदवत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईनंतरही खुलेआम त्याच ठिकाणी पार्किंगच्या नावावर भरमसाठ पैसे वसूल केले जात आहेत. रस्त्यावरील मोकळ्या जागाही मंडळी बळकावत आहे.

माफियांच्या हाती बचत गट-   पोलिस आयुक्त कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या पार्किंगच्या जागेवर सदाफुले महिला बचत गटाच्या नावाने गेल्या दोन वर्षांपासून पे अँड पार्क सुरू आहे. -   बचत गटाच्या नावाखाली काही माफिया मंडळी हे हाताळत असल्याचे चित्र आहे. -   मुंबईत फक्त महिला बचत गटांना पे अँड पार्क दुचाकी आणि चार चाकी वाहनांची ४९ कंत्राटे देण्यात आली आहे.-   जे जे उड्डाणपुला लगत आणि क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेने दोन ठिकाणी ही वाहने पार्क होतात. -   ४ जानेवारी २०२४ ला त्यांचे कंत्राट संपत आहे. येथे जवळपास २५ ते ३० जण गाड्या पार्क करण्याच्या कामाला आहेत. -   पार्किंगच्या शोधात येथील रस्त्यावर वाहन येताच हे कर्मचारी पुढे धावत येत त्यांच्याकडे गाडीच्या चावीची मागणी करत पार्क करतो असे सांगतात.-   अधिकृत पार्किंग परिसर कायम भरलेला दिसतो. पार्किंग फुल होताच सुमारे तासाभरासाठी पार्किंगला आलेली वाहने हे कर्मचारी रस्त्यावर दोन लाईनमध्ये पार्क केली जातात. गजबजलेल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. 

क्षमता फक्त १५० वाहनांचीक्रॉफर्ड मार्केट लगत पे अँड पार्क चालवणाऱ्या रईस शेख याला विचारले तर तो म्हणाला, फक्त दीडशे वाहनांची क्षमता असून दोन ठिकाणी पार्किंगचे अधिकार आहे. सदाफुले कंपनीच्या नावाखाली आम्ही चालवत असल्याचे त्याने सांगितले. मात्र त्यांच्या प्रमुखाचा नाव आणि क्रमांक दिला नाही. शिवाय ते समोरून कॉल करतील असे सांगून प्रतिसाद आला नाही.

वरिष्ठ अधिकाऱ्याकडूनही टार्गेट ?मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पदभार स्विकारताच काही वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपायुक्तांना पार्किंग आणि टँकर माफियांकडून थेट वसुलीसाठी दबाव सुरू केल्याचे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने सांगितले. काहींनी त्याला प्रतिसाद दिला तर काहींनी दबाव झुगारत काम सुरूच ठेवले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापार्किंग