नालासोपारा : महामार्गावर रिक्षा चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या आणि दुचाकींची चोरी करणाऱ्या त्रिकुटाला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ७ सप्टेंबरला अटक केली आहे. सदर आरोपींकडून पाच गुन्ह्यांची उकल करून रिक्षा, गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि चार चोरीच्या दुचाकी असा एकूण २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बुधवारी प्रेस नोटने दिली आहे.
५ सप्टेंबरला रिक्षाने प्रवास करणारे रविशंकर तिवारी नालासोपारा रेल्वे स्थानक ते धानिवबाग येथील घरी जात होते. त्यावेळी रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्यांचे जबरीने अपहरण करून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा उड्डाणपुलावर चाकूचा धाक दाखवून खिशातील एक मोबाईल, रोख रक्कम आणि इतर कागदपत्रे जबरीने काढून घेतली.
वालीव पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीनुसार व तांत्रिक विश्लेषणावरून सदर गुन्ह्यातील जबरी चोरी करणारे आरोपी शिव तिवारी (२४), अन्नू तिवारी (२०) आणि शिवम तिवारी यांना ७ सप्टेंबरला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या त्रिकुटाकडून रिक्षा व गुन्ह्यांत वापरलेला चाकू जप्त केला आहे. आरोपींकडून वालीव येथील २, आचोळे व नवघर येथील १-१ असे दुचाकीचे ४ गुन्हे असे एकूण ५ गुन्ह्यांची उकल केली आहे.
जबरी चोरी व दुचाकी चोरणारी त्रिकुटाच्या टोळीला अटक केले आहे. ५ गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. आरोपींची वेगवेगळ्या गुन्ह्यांत पोलीस कोठडी सुरू असून तपास सुरू आहे. - कैलास बर्व्हे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे)