मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी फैजापूर - साकेत एक्स्प्रेसवर दरोडा टाकून प्रवाशांची लूट करणाऱ्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.बुधवारी पहाटेच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनसजवळील झाडीमध्ये १२ जणांची टोळी आसरा घेऊन बसली होती. यांच्याकडून फैजापूर - साकेत एक्स्प्रेस लुटण्याचा कट रचला गेला होता. त्यामुळे एक्स्प्रेस येण्याची वाट ही टोळी पाहत होती,अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तत्काळ आपले पथक कुर्ला - विद्याविहार या परिसरात पाठविले. या वेळी पोलिसांना १२ जणांची टोळी दिसली. पोलिसांनी छापा मारून १२ दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र यामधील ५ दरोडेखोर झाडाझुडपांचा आणि अंधाराचा फायदा घेऊन निसटले. पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले असून ५ जणांचा शोध सुरू आहे.पोलिसांनी पकडलेल्या सात आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी फैजापूर - साकेत एक्स्प्रेसवर दरोडा घालण्यास आल्याची कबुली दिली आहे. आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
साकेत एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्यास आलेल्या दरोडेखोरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 5:39 AM