दागिने घेण्यासाठी आले अन्...; सातरस्त्याच्या रिषभ ज्वेलर्सवर दरोडा, १.९३ कोटींचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 14:07 IST2024-12-31T14:06:21+5:302024-12-31T14:07:46+5:30
दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या बंदूक आणि चाकूच्या धाकाने मालकासह कामगारांना बांधून ठेवून दुकानातील एक कोटी ९३ लाख ६१ हजारांचा ऐवज लंपास केला.

दागिने घेण्यासाठी आले अन्...; सातरस्त्याच्या रिषभ ज्वेलर्सवर दरोडा, १.९३ कोटींचा ऐवज लंपास
मुंबई : गजबजलेल्या सातरस्ता परिसरातील रिषभ ज्वेलर्समध्ये दागिने घेण्यासाठी आलेले ग्राहकच लुटारू निघाल्याने खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या बंदूक आणि चाकूच्या धाकाने मालकासह कामगारांना बांधून ठेवून दुकानातील एक कोटी ९३ लाख ६१ हजारांचा ऐवज लंपास केला.
चिंचपोकळी परिसरात राहणारे व्यावसायिक भवरलाल धरमचंद जैन (५०) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार दरोडेखोरांनी २,४५८ ग्रॅमचे सोन्याचे एक कोटी ९१ लाख ६० हजार रुपये किमतीच्या दागिन्यांसह एक लाख ७६ हजार किमतीचे २२०० ग्रॅमचे चांदीचे दागिने आणि १५ हजारांची रोकड यांसह वायफाय राउटरही लंपास केला.
सातरस्त्याच्या साने गुरुजी मार्गावरील लक्ष्मीदास वाडीत रिषभ ज्वेलर्सचे दुकान आहे. रविवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी दागिने घेण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. काही कळण्याच्या आतच त्यांनी जैन आणि त्यांचा कामगार पुरण कुमारला बंदूक आणि चाकू दाखवून धमकावले आणि दोरीने बांधून ठेवले. तसेच ठार मारण्याची धमकी देत दुकानातील ऐवज लांबवला.
आग्रीपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपींनी यापूर्वी रेकी करून चोरीचा कट रचल्याचा संशय आहे.
जैन यांनी सांगितलेला घटनाक्रम तसेच आरोपींच्या वर्णनावरून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिली.
गुन्हे शाखेचे कार्यालय हाकेच्या अंतरावर
धक्कादायक बाब म्हणजे गुन्हे शाखेच्या कक्ष २ चे कार्यालयही सातरस्ता परिसरात आहे. गुन्हे शाखेचे कार्यालय जवळ असतानाही घडलेल्या या गुन्ह्याने व्यापाऱ्यांच्या काळजीत भर पडली आहे.