मुंबई: वांद्रे वरळी सीलिंकवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांचा गाशा वेळीच गुंडाळण्यात अधिकाऱ्यांना यश मिळाले. वांद्रे पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपींकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या दोन पसार साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वांद्रे पोलिसांच्या हद्दीत ११ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. तेव्हा नित्यानंद नगर जवळील फुटपाथवर अंधारात सहा उभे असल्याचे पथकाने पाहिले. पोलीस दबक्या पावलांनी त्यांच्याजवळ गेले. तेव्हा त्यापैकी दोन व्यक्तींनी पोलिसांना पाहत अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. मात्र उर्वरित चौघांना पोलिसांनी पकडत त्यांची अंगझडती घेतली. त्यांची नावे समीर शेख उर्फ मेंढा, मोहम्मद कुरेशी, मोहम्मद अली शेख उर्फ भुऱ्या आणि राज खरे अशी असून त्यांच्याकडे हातोडा, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर आणि लोखंडी सुरा ही हत्यार सापडली. याचा वापर करून ते वांद्रे वरळी येथील सिलिंक टोलनाक्याचे केबिन लुटण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे
आरोपींविरोधात वांद्रे पोलिसांनी संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या पसार झालेल्या दोन साथीदारांबाबतही माग काढण्यात येत आहे.