लुटारूंकडून गोळीबार : दहिसरच्या ज्वेलर्समध्ये लूट, मालकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 10:54 AM2021-07-01T10:54:19+5:302021-07-01T10:55:42+5:30

लुटारूंकडून गोळीबार : तिघे सीसीटीव्हीत कैद

Robbery at Dahisar jewelers, murder of owner | लुटारूंकडून गोळीबार : दहिसरच्या ज्वेलर्समध्ये लूट, मालकाची हत्या

लुटारूंकडून गोळीबार : दहिसरच्या ज्वेलर्समध्ये लूट, मालकाची हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बंदुकीचा धाक दाखवून मास्कधारी तिघे जण ओम साईराज ज्वेलर्समध्ये शिरले. ज्वेलर्स मालक शैलेंद्र पांडे (४६) यांनी त्यांना विरोध केला असता लुटारूंनी त्यांच्यावर गोळी झाडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास हा थरार दहिसरमध्ये घडला. यातील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. दहिसर पूर्वच्या रावळपाडा परिसरातील गावडे नगरमध्ये ओम साईराज ज्वेलर्स आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास तीन इसम मास्क घालून पांडे यांच्या दुकानात घुसले. पांडे यांनी त्यांना विराेध केला असता त्यांनी पांडे यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यामुळे पांडे गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळले. त्यानंतर तिघांनी दुकानातील सोन्याचे दागिने असलेल्या बॅग उचलल्या आणि ते स्कूटीवरून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच रावळपाडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत हेही घटनास्थळी पोहोचले. या गंभीर प्रकारची दखल  घेत विश्वास नांगरे-पाटील (सहपोलीस आयुक्त-कायदा, सुव्यवस्था) यांनी तातडीने चौकशी सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले. पांडे यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींकडून जबाब पोलीस नोंदवत असून गुन्हे प्रकटीकरण शाखा देखील याचा समांतर तपास करत आहे.

पूर्वनियोजित कट असल्याचा संशय
दहिसर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता स्कूटीवरून ट्रिपल सीट जाणारे तिघे त्यात कैद झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या स्कूटीची नंबर प्लेट पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी वाकडी करून ठेवली हाेती. त्यामुळे हत्या व लुटीचा कट पूर्वनियोजित असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Robbery at Dahisar jewelers, murder of owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.