गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मालाड पूर्व परिसरात असलेल्या वकिलाच्या ऑफिसचे लॉक तोडून आत प्रवेश करत लाखो रुपयांच्या वस्तू पळवण्यात आल्या. या विरोधात दिंडोशी पोलिसात तक्रार देण्यात आली असून चोराचा शोध सुरू आहे. तक्रारदार अंकितकुमार पांडे (२४) हे व्यवसायाने वकील असून ॲड. जीत गांधी यांच्याकडे असोसिएट म्हणून नोकरी करतात.
पांडे यांनी दिंडोशी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, १९ जुलै रोजी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारा क्लार्क ऑफिस उघडायला आला. तेव्हा सदर ऑफिसचे शटर अर्धवट उघडे असल्याचे त्याने पाहिले. तसेच ऑफिसमधील दोन लॅपटॉप आणि इतर साहित्य देखील गायब असल्याने त्याने याबाबत पांडे आणि गांधीना फोन करून याबाबत कळवले. त्यानंतर पांडे हे ऑफिसमध्ये पोहोचले आणि त्यांनी तपासले असता टेबलवरील दोन लॅपटॉप, दोन कीबोर्ड, दोन माउस, एक स्कॅनर आणि प्रिंटर त्याठिकाणी सापडला नाही. तसेच अन्य वस्तूही अस्ताव्यस्त पडल्या होत्या. इतकेच नव्हे तर गांधी यांना त्यांच्या क्लायंटने दिलेले १.५० लाख रुपये देखील चोरण्यात आले होते. त्यानुसार पांडे यांनी याप्रकरणी दिंडोशी पोलिसात धाव घेत एकूण २ लाख रुपयांच्या मालमत्तेची चोरी केल्याप्रकरणी तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी बीएनएस कायद्याचे कलम ३०५,३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.