मीरा रोडमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:17 AM2021-01-08T04:17:31+5:302021-01-08T04:17:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगरमधील एस. कुमार या ज्वेलर्सवर गुरुवारी दुपारी चौघा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगरमधील एस. कुमार या ज्वेलर्सवर गुरुवारी दुपारी चौघा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दरोडा घातला. सुमारे दोन कोटींचे दागिने लुटून त्यांनी पोबारा केला.
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास दुकानातील काही कर्मचारी जेवायला बसले होते, तर काही कर्मचारी काउंटरजवळ उभे होते. त्या वेळी दोन दुचाकींवरून आलेले चौघे दरोडेखोर हे ग्राहक म्हणून दुकानात आले. चौघांनी दागिने खरेदी करायचे म्हणून कर्मचाऱ्यांना दागिने दाखवायला सांगितले. कर्मचाऱ्यांनी त्यांना दागिने काढून दाखवले. खरेदी केलेल्या दागिन्यांचे पैसे मागितले असता चौघांपैकी दोघांनी अग्निशस्त्रे काढली. पिस्तुलाचा धाक दाखवून चौघांनी शोकेसमधील दागिने बॅगेत भरले व बाहेर आले. दोघे जण एका दुचाकीवरून निघून गेले तर एक दुचाकी सुरू न झाल्याने दोघांनी दुचाकी तशीच टाकून चालत मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघून गेले.
दरोड्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नयानगर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि दुचाकीच्या क्रमांकावरून दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे. पोलीस आयुक्तालय झाल्यानंतरची दरोड्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे. या दरोड्यात हिरे, पांढरे सोने व सोन्याचे सुमारे दोन कोटींचे दागिने दरोडेखोरांनी लुटून नेल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.