मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लूट

By admin | Published: May 9, 2016 02:04 AM2016-05-09T02:04:59+5:302016-05-09T02:04:59+5:30

मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर लेनमध्ये दगड टाकून कारमधून कोल्हापूरकडे निघालेल्या कुटुंबाला माराहण करून लुटण्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

Robbery on Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लूट

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लूट

Next

वावोशी : मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर लेनमध्ये दगड टाकून कारमधून कोल्हापूरकडे निघालेल्या कुटुंबाला माराहण करून लुटण्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. दोन चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे ४२ हजारांचा ऐवज लुटला आहे.
मुंबईत काळा चौकी येथे राहणारे कृष्णा साबळे (३९) हे पत्नी संगीता (३७) व मुलगी प्राजक्ता (१७) सह सँट्रो कार (एमएच०१जेएम३६५७) ने कोल्हापूरला निघाले होते. रविवारी कृष्णा यांच्या भाच्याचे मलकापूरला येथे लग्न होते. शनिवारी पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास खालापूर हद्दीत माडपनजीक पहिल्या लेनवर चोरट्यांनी भला मोठा दगड ठेवला होता. गाडी चालवित असलेल्या कृष्णा यांना लेनवर पुठ्ठा पडला असेल असे समजून त्यांनी दगडावरून कार नेताच कार अनियंत्रित झाली, मात्र पलटी होता होता वाचली. कृष्णा यांनी कार लेनच्या कडेला उभी करून कारची पाहणी करीत असताना अचानक बाजूच्या झाडीतून दोन तरुण पुढे आले. त्यातील एकाने कारची काच फोडून कृष्णा यांच्या पत्नीच्या हातातील बॅग खेचून घेतली. कृष्णा यांनी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या चोरट्याने लाकडी दांडक्याचा फटका कृष्णा यांच्या डोक्यात मारला. यामध्ये कृष्णा साबळे जखमी झाला. वडिलांना होत असलेली मारहाण पाहून प्राजक्ता मध्ये पडली असता, तिलाही मारहाण करून तिच्या कानातील सोन्याची कर्णफुले काढून पळ काढला. जखमी साबळे यांनी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेकांकडे मदतीची याचना केली, परंतु कोणीही मदतीकरिता थांबले नाही. अखेर कारच्या गीअर बॉक्सचे नुकसान झाले असताना जखमी अवस्थेत कृष्णा साबळे मुंबईच्या दिशेने परत निघाले. परंतु तीन-चार किलोमीटरनंतर कार बंद पडली. अखेर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचालकाने टोचनने साबळे यांची कार कळंबोलीपर्यंत आणली. जखमी कृष्णा साबळे एमजीएम रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली.
कृष्णा साबळे यांनी दुपारी खालापूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. (वार्ताहर)

Web Title: Robbery on Mumbai-Pune Expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.