ताडदेवमध्ये वृद्ध दाम्पत्याची लूट; घरात घुसून लुटारूंनी केली पत्नीची हत्या, पहाटे लुटीचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 09:41 AM2023-08-14T09:41:57+5:302023-08-14T09:45:09+5:30
या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी हत्या व लूट असे गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ताडदेवमध्ये रविवारी सकाळी तीन लुटारूंनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्याचे हात पाय बांधून, बंदुकीच्या धाकावर किमती ऐवजावर डल्ला मारला. इतकेच नव्हे तर या साऱ्या प्रकारात त्यांनी ७० वर्षांच्या वृद्ध महिलेचीही हत्या केली. सुरेखा अग्रवाल (७०) असे वृद्धेचे नाव आहे.
या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी हत्या व लूट असे गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. मात्र यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ताडदेव येथील युसूफ मंजिल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अग्रवाल दाम्पत्य राहतात. मदन अग्रवाल यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. अग्रवाल रोज सकाळी सहा ते साडे सहादरम्यान वाॅकसाठी जातात. रविवारी मॉर्निंग वाॅकला जाण्यासाठी दरवाजा उघडताच, तेथे दबा धरून बसलेले त्रिकुटाने त्याने आतमध्ये ढकलून दरवाजा लावून घेतला. त्यांनी, बंदुकीच्या धाकात मदन यांचे हात पाय बांधून सेलोटेपने तोंड बंद केले. काही वेळाने त्यांच्या पत्नीचा शोध घेतला. पत्नी बेडरूममध्ये असल्याने त्यांचेही हात पाय बांधून सेलोटेपने तोंड बंद केले. त्यांच्या अंगावरील तसेच घरातील किमती ऐवज लुटून आरोपी पसार झाले.
काही वेळाने मदन अग्रवाल यांनी लोळतच दरवाजा गाठून ओरडण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांची हाक शेजाऱ्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी अग्रवाल यांची सुटका केली. त्यानंतर पत्नीचा शोध घेतला असता त्या बेशुद्धावस्थेत दिसल्या. सुरेखा यांना जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
रेकी केल्याचा संशय
अग्रवाल नेहमी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत असल्याचे आरोपींना माहिती होते. त्यांनी, रेकी केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, तपास केला जात आहे.