घरफोडी करणारे रिक्षाचालक जेरबंद
By admin | Published: May 2, 2017 03:52 AM2017-05-02T03:52:57+5:302017-05-02T03:52:57+5:30
दिवसभर रिक्षा चालवत असताना घरांची रेकी केल्यानंतर, रात्रीच्या वेळेस घरफोडी करून लाखोंचा माल लंपास करणाऱ्या
मुंबई : दिवसभर रिक्षा चालवत असताना घरांची रेकी केल्यानंतर, रात्रीच्या वेळेस घरफोडी करून लाखोंचा माल लंपास करणाऱ्या दोन रिक्षाचालकांना टिळकनगर पोलिसांनी रविवारी गोवंडी येथून अटक केली आहे. नदीम शेख (२२) व मुशर्रफ शेख (१८) अशी या आरोपींची नावे असून, दोघेही गोवंडी परिसरात राहणारे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडीच्या घटना वाढत होत्या. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवली होती. मात्र, तरी हे चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. तीन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे या चोरांनी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालय परिसरात असलेल्या एका इमारतीत घरफोडी केली होती. घरात कोणीच नसल्याने या आरोपींनी येथील लाखोंचा माल लंपास केला.
मात्र, या इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये यातील मुख्य आरोपी नदीम याचा चेहरा कैद झाला होता.
त्यानुसार, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. हा आरोपी हा रिक्षाचालक असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, त्याचा शोध घेत पोलिसांनी त्याला गोवंडीतील राहत्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे, तसेच त्याने त्याच्या दोन साथीदारांची नावेदेखील पोलिसांना दिली. त्यानुसार, पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)