आरोपी जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याकडील २७ लाखांची रोकड़ पळवणाऱ्या दुकलीला टीपरसह नवघर पोलिसांनी जेरबंद केले आहे. कल्याण येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी रात्री नीलमनगर परिसरात जिग्नेश शहा हे विविध व्यापाऱ्यांचे पैसे घेऊन बँकेत भरण्यासाठी जात असताना, पोलीस गणवेशात असलेल्या दुकलीने त्यांना वाटेत अडवले. त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन ही दुकली पसार झाली. शहा यांनी तत्काळ नवघर पोलीस स्थानकात याविषयीची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.
पोलिसांनी आरोपी खरे की खोटे, याचा शोध सुरु केला. नवघर पोलिसांसह गुन्हे शाखेनेही याचा समांतर तपास सुरु केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस स्थानकाचे निरीक्षक (गुन्हे) संजय खेडकर यांनी तपास सुरु केला.
यावेळी तपास करताना सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधित दुचाकीचा क्रमांक मिळाला. त्यावरून मोबाईल क्रमांक मिळवून आणि १४ दिवसाने तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आरोपी कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, गुन्ह्यातील टिपरसह तीन आरोपींना बेडया ठोकण्यात आल्या. यात पोलीस गणवेश घालून पोलीस असल्याची बतावणी करणारा हा खरा पोलीस नसून, एक रिक्षाचालक असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीकड़ून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात येत असून, अधिक तपास सुरु आहे. आतापर्यंत १७ लाख ३७ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
....
एक महिन्यापासून रेकी
यात एक महिन्याआधी आरोपींनी शहा कुठे येतात, कुठे जातात याची रेकी केली. त्यानंतर पोलीस असल्याची बतावणी करत पैशांवर हात साफ केला.
.....