मुंबई : झवेरी बाजारातील सोन्याचे दागिने घडविणा-या कारखान्यातील कारागिरांना बांधून बंदूक आणि चाकूच्या धाकावर बुधवारी रात्री दरोडा टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. यामध्ये ३६ लाखांच्या सोन्यावर दरोडेखोरांनी डल्ला मारला आहे. एलटी मार्ग पोलिसांनी दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. यामागे ओळखीच्याच व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झवेरी बाजारातील मेमन स्ट्रीटवरील कारखान्यात हा दरोडा टाकण्यात आला. सोने कारागीर सौमन कारक (२६) यांनी दिलेल्या जबाबानुसार, बुधवारी रात्री साडेअकरा वाजता कारखान्यात कारागीर काम करत असताना, काही लुटारूंनी बंदुकीसह आतमध्ये प्रवेश केला.सहाही कारागिरांना बांधले आणि बंदूक, चाकूच्या धाकावर कारखान्यातील ३६ लाख किमतीचे सोने घेऊन पळ काढला. या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास देण्यात आली. नियंत्रण कक्षाकडून समजताच एल.टी. मार्ग पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी कारक याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी त्यांचा अधिक तपास सुरू आहे.प्राथमिक तपासात ओळखीच्याच व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच आरोपींबाबतही पोलिसांना सुगावा लागल्याचे समजते.त्या दिशेने त्यांनी सुरुवातीला कामगारांकडेच चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच अन्य रहिवासी, दुकानदारांकडेही पोलीस कसून चौकशी करत आहेत.या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.
झवेरी बाजारातील कारखान्यात दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 4:20 AM