रोबोंमध्येही रंगला थरार...
By admin | Published: January 3, 2015 01:00 AM2015-01-03T01:00:05+5:302015-01-03T01:00:05+5:30
तांत्रिक करामतींबरोबरच युद्धाचा रोमांचकारी अनुभव देणारे ‘रोबो वॉर’ टेकफेस्टच्या स्पर्धांमध्ये सर्वात आकर्षक स्पर्धा मानली जाते.
मनीषा म्हात्रे ल्ल मुंबई
तांत्रिक करामतींबरोबरच युद्धाचा रोमांचकारी अनुभव देणारे ‘रोबो वॉर’ टेकफेस्टच्या स्पर्धांमध्ये सर्वात आकर्षक स्पर्धा मानली जाते. पवई आयआयटी येथील टेकफेस्टपासून या स्पर्धेची सुरुवात झाली. या अनोख्या वॉरमध्ये रंगलेला थरार पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक गर्दी या ठिकाणी दिसून आली.
जवळपास ६०० विद्यार्थ्यांच्या गटातून निवडक अशा ७० टीमचा थरार फेस्टच्या पहिल्या दिवशी रंगला. मेकॅनिझम, रोलर, स्लाइडर अॅण्ड हॅमर अशा नानाविध स्वरूपात तयार केलेले रोबो बोर्ड या वॉरमध्ये सहभागी झाले होते. तीन ते चार महिने एक रोबो बोर्ड तयार करण्यासाठी लागत असून, यासाठी मेटल शीट, बॅटरी, मोटार रोलर अशा अनेक वस्तूंचा तांत्रिक बाबींंशी जोड देत हा रोबो बोर्ड तयार करण्यात येतो. वायरलेस रिमोटच्या सहाय्याने एका टीमचा रोबो दुसऱ्या टीमच्या रोबोवर हल्ला करीत असताना वातावरण भारून गेले होते. एका रोबोचे वजन अंदाजे ५० ते ५५ किलो असते. अशात वायरलेस रिमोटच्या साहाय्याने वॉररूमच्या बाहेरून कंट्रोल करीत खेळला जाणारा खेळ मनोरंजक असल्याचे वैभव कोरी या विद्यार्थ्याने सांगितले.
सोमय्याचे अनोखे बुद्धिबळ
च्एरव्ही डोक्याला जोर देत खेळला जाणाऱ्या बुद्धिबळाच्या खेळालाही तंत्रज्ञानाची जोड देत क. जे. सोमय्याच्या विद्यार्थ्यांनी लढवलेली अनोखी शक्कलही टेक्नोप्रेमींंच्या पसंतीस उतरली.
च्मुळात दोघांमध्ये रंगणारा हा खेळ आता एकटी व्यक्तीही खेळू शकते; एवढेच काय तर यामध्ये तंत्रज्ञानाच्या जोडीने आमनेसामने न बसताही कॉम्प्युटरच्या साहाय्याने दूरची व्यक्ती या खेळाचा आनंद घेऊ शकते, हे यातून दिसून आले.
च्चेस बोर्डवर ठेवलेल्या सोंगट्यांना चुंबकाचा आधार देत विशेष सॉफ्टवेअरच्या साहाय्याने त्याची जोड कॉम्प्युटरशी करण्यात आली.
मिशन सुरक्षा...
च्एकीकडे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेतून तयार झालेल्या या यांत्रिक करामती रंगल्या असताना दुसरीकडे सामाजिक कास धरीत मिशन सुरक्षा हा अनोखा उपक्रम दिसून आला. राज्यभरातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडत मिशन सुरक्षा हा अनोखा मेसेज या टेक फेस्टमधून देण्यात येत आहे.
च्धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण सुरक्षेकडे दुर्लक्ष करतो आणि सुरक्षेअभावी त्यांना मृत्यूच्या जाळ्यात ओढले जाते, यासाठीच हा उपक्रम राबवित असल्याचे मिशन सुरक्षाचे शिरीष नाडगौडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भारतीय सुरक्षा...
टेक्नोफेस्टमध्ये देशाच्या सागरी सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौसेनेही सहभाग घेतला आहे. अफाटपणाचे दर्शन घडवणारी आयएनएस विक्रांत, आयएनएस तलवार अशा युद्धनौकांनी फेस्टची शान वाढवली.
एव्हिएटर डिझाइन
एव्हिएटर डिझाइन स्पर्धेत स्पर्धकांना विमान तयार करायचे होते. विविध प्रकारचे लहान-मोठे विमाने तयार करण्याचे कौशल्य स्पर्धकांना यात दाखवायचे होते.
कॅनटिलीवो
टेकफेस्टमध्ये स्पर्धकांसाठी एक आगळीवेगळी स्पर्धाही आयोजित करण्यात आली. यात त्यांना आइसक्रीमच्या कांड्यापासून विविध आकृत्यांची रचना तयार करायची होती.
बीच बॉट...
यंदा प्रथमच ‘बीच बॉट’चा समावेश टेकफेस्टमध्ये करण्यात आला आहे. हा रोबो वाळूवर विविध प्रकारची कलाकृती काढू शकतो. झुरीच येथील स्वीस फेडरल तंत्रज्ञान संस्थेने हा रोबो विकसित केला आहे. सध्यातरी याचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी करण्यात येत आहे. सॅण्ड आर्टिस्टच्या मागणीनुसार हा रोबो तयार केला असल्याचे संस्थेच्या सदस्याने सांगितले.
इनमुव्ह...
टेक्नोफेस्टमध्ये लक्षवेधी ठरला तो फ्रान्सच्या भारतीय दूतावासातील विज्ञान विभागाने तयार केलेला ‘इनमुव्ह’ रोबोट. थ्रीडी प्रिंटने तयार केलेला हा रोबो मनुष्याचा हालचालींना प्रत्युत्तर देतो. तसेच त्याच्याशी संवादही साधता येतो. अशा या ‘ओपन सोर्स थ्रीडी प्रिंटेड लाईफ - साईज रोबोट’ रोबो प्रेमींना भुरळ घालणारा ठरला.
बायोनिक हॅण्ड...
टेकफेस्टच्या मुख्य आकर्षणांमध्ये ‘बायोनिक हॅण्ड’ हे होते. फ्रान्सच्या भारतीय दूतावासातील विज्ञान विभागाने हा जैविक हात तयार केला आहे. या हाताचे वैशिष्ट्य म्हणजे हा हात नैसर्गिक हाताप्रमाणेच हालचाल करतो. शिवाय या जैविक हाताला संवेदनाही होतात. याचा उपयोग हाताने अधू असलेल्या व्यक्तींसाठी विशेष होणार आहे.
ओझोन : याशिवाय जगातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक बाइक, थ्रीडी बुद्धिबळ पट, मेंदूच्या रिअल टाइल हालचाली टिपणे, चेहरा ओळखणे अशा विविध खेळांचा ओझोन अंतर्गत समावेश आहे. तसेच जंकयार्ड वॉर, लेझर टॅग, बंजी जंम्पिंग, एफ वन सिम्युलेटर, आॅकलस रिफ्ट, फ्लाइट सिम्युलेटर, सॉकर क्राफ्ट, आर्ट इन्स्टॉलेशन, जगलिंग कार्यशाळा, हुल हूप कार्यशाळाही टेकफेस्ट दरम्यान पार पडल्या.