‘ब्रिंग इट ऑन’ म्हणत टेकफेस्टमध्ये दाखल झाला रोबो आईनस्टाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 05:53 AM2020-01-06T05:53:38+5:302020-01-06T05:53:43+5:30

मी सतत स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि ‘ब्रिंग इट आॅन’ हे माझं ब्रीद असल्याचे टेकफेस्टमध्ये आपली भुरळ पाडण्यासाठी आलेल्या ह्युमनोईड रोबोट आईन्स्टाईनने म्हटले.

Robo Einstein arrives at TechFest saying 'Bring it on' | ‘ब्रिंग इट ऑन’ म्हणत टेकफेस्टमध्ये दाखल झाला रोबो आईनस्टाईन

‘ब्रिंग इट ऑन’ म्हणत टेकफेस्टमध्ये दाखल झाला रोबो आईनस्टाईन

Next

मुंबई : मी सतत स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि ‘ब्रिंग इट आॅन’ हे माझं ब्रीद असल्याचे टेकफेस्टमध्ये आपली भुरळ पाडण्यासाठी आलेल्या ह्युमनोईड रोबोट आईन्स्टाईनने म्हटले. मी प्रोफेसर अल्बर्ट आईनस्टाईन यांची प्रतिकृती असून त्यांच्यासारखाच नम्र स्वभाव हे माझे स्वभाववैशिष्ट्य असले तरी आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मी सतत स्वत:ला डेव्हलप करत असल्याचे आईनस्टाईन रोबोटने टेकफेस्टमधील उपस्थितांशी संवाद साधताना आवर्जून सांगितले.
आईनस्टाईनची प्रतिकृती असलेल्या रोबोला जेव्हा त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याबद्दल शंका घेण्याचे कारणच नसल्याचा दावा त्याने केला. विशेषकरून गणिती प्रक्रियांसाठीच मला प्रोग्राम करण्यात आले असल्याचे त्याने स्पष्ट केले. सध्या माणसाद्वारे माझे प्रोग्रामिंग सेट केले जात असले तरी पुढील काही वर्षांत मी स्वत:चा प्रोग्राम स्वत:च सेट करेन असे डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्याने केला. सोबतच माणूस ज्या प्रक्रिया करण्यात सध्या स्वत:ला गुंतवून बसला आहे त्या मी चुटकीसरशी सोडवून दाखवेन, असेही त्याने म्हटले.
रोबो थेस्पिअनप्रमाणेच ह्युमनोईड रोबो आईनस्टाईन हे यंदाच्या टेकफेस्टचे दुसरे मोठे आकर्षण होते. रविवार असल्यामुळे विशेषत: लहान मुले आणि त्यांच्या पालकांनी तरुणाईसोबत या संवाद साधणाऱ्या रोबोला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली. मात्र अनेकांचा हिरमोड झालेला पाहण्यास मिळाला. रोबो आईन्स्टाईनने उपस्थितांशी केवळ निवेदिकेने विचारलेल्या काही मोजक्या प्रश्नांची उत्तरे देत संवाद साधला. उपस्थितांमधून संवादासाठी कोणतेही प्रश्न घेण्यात आले नाहीत किंवा माध्यमाशीही कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्याची संधी आयोजकांकडून देण्यात आली नाही. मुख्य म्हणजे आईनस्टाईन रोबोट आपल्याला लेक्चरच्या माध्यमातून काही तरी नवीन ज्ञान देईल, हा विचार करून आलेल्या तरुणाईचा भ्रमनिरास होऊन संवाद १० मिनिटांतच आटोपण्यात आला.
हाँगकाँगच्या ज्या हॅन्सन कंपनीकडून याआधी सोफिया, बिना ४८ सारखे ह्युमनोईड बनविण्यात आले आणि त्यांनी उपस्थितांची मने जिंकली त्याच कंपनीकडून रोबो आईनस्टाईनची निर्मिती झाल्यामुळे आम्हाला खूप अपेक्षा होत्या. आयोजकांनी केवळ निवेदिकेपर्यंत प्रश्न-उत्तरे मर्यादित न ठेवता उपस्थित प्रेक्षकांनाही संधी दिली असती तर त्याची उपयुक्तता, बुद्धिमत्ता, संवादकौशल्य यांचा खरा कस लागला असता, असे मत पुण्याहून टेकफेस्टसाठी आलेल्या रुचिका अभंग हिने व्यक्त केले. रुचिका पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष पदवीचे शिक्षण घेत असून सोफियाच्या भन्नाट अनुभवानंतर आईनस्टाईन रोबोचा अनुभव घेण्यासाठी टेकफेस्टमध्ये आली होती.
>सेशन अधिक मनोरंजक हवे होते!
सोफिया आणि आईन्स्टाईनची तुलना करता येणार नाही कारण आईनस्टाईन रोबो विशेषकरून गणिती प्रक्रियांसाठी तर सोफिया आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित समाजाभिमुख होण्यासाठी प्रोग्राम केले आहे. तरीही टेकफेस्टमधील आईनस्टाईन रोबो सेशन अधिक मनोरंजक आणि उजवे असायला हवे होते, असे मत पुण्याच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेल्या यश घन याने व्यक्त केले.

Web Title: Robo Einstein arrives at TechFest saying 'Bring it on'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.