Join us

रोबो थेस्पिअन ठरला आयआयटी टेकफेस्टचा सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 5:17 AM

‘तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकून घेतले सारे, हा रोबो आहे एक नंबर सुपरस्टार...’ असेच काहीसे वातावरण रोबो थेस्पिअनच्या एण्ट्रीने आयआयटी बॉम्बेच्या टेकफेस्टमध्ये पाहायला मिळाले.

मुंबई : ‘तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकून घेतले सारे, हा रोबो आहे एक नंबर सुपरस्टार...’ असेच काहीसे वातावरण रोबो थेस्पिअनच्या एण्ट्रीने आयआयटी बॉम्बेच्या टेकफेस्टमध्ये पाहायला मिळाले. यंदाच्या आयआयटी टेकफेस्टचे प्रमुख आकर्षण ठरलेला रोबो थेस्पिअन. मराठीत बोलला नसला, तरी ‘नमस्ते इंडिया’ म्हणत त्याने त्याला पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीची मने जिंकली. इतकेच नाही, तर मुंबई शहराची भरभरून स्तुती करताना, इंडिया गेटचा विशेष उल्लेखही केला. टेकफेस्टच्या निमित्ताने युकेवरून मुंबईत आल्याचा विशेष आनंद होत असल्याचे त्याने टेकफेस्टच्या तरुणाईशी आणि लहान-ज्येष्ठांशी साधलेल्या संवादाच्या वेळी आवर्जून सांगितले.मुळातच भारत हा विविधतेने आणि संपन्नतेने नटलेला देश आहे. टेकफेस्टसारख्या तंत्रज्ञानाच्या मेळाव्याच्या निमित्ताने मला येथे यायला मिळाले, याचाच मला आनंद आहे, असे सांगत रोबो थेस्पिअनने त्याला पाहायला आलेल्या तंत्रवेड्या तरुणाईला भूरळ घातली. ३०हून अधिक भाषा बोलणारा रोबो थेस्पिअन हा ह्युमनॉइड यंदाच्या टेकफेस्टचे सर्वात मोठे आकर्षण ठरला आहे. ५ फूट ९ इंच उंच आणि ३३ किलो वजनाच्या रोबो थेस्पिअनच्या काही हालचाली या एअर मसल्स व सर्वो मोटरच्या साहाय्याने नियंत्रित करण्यात आल्या असून, हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील नटांना टक्कर देण्याची ताकद आपल्यात आहे. या जगात लिओ नार्दो, एंजलिना जॉलीसारखे खूप चांगले अभिनेते, अभिनेत्री आहेत, असे म्हणत टर्मिनेटर २ मधील अरनॉल्ड श्वार्झनेगरचा ‘हास्ता ला विस्ता, बेबी’ हा फेमस डायलॉगही प्रेक्षकांसाठी म्हटला, त्यावर तरुणाईकडून प्रचंड प्रतिसादही मिळाला. पुढील ५ वर्षांत बेस्ट परफॉर्मर ह्युमनॉइड रोबोट म्हणून आपणच आॅस्कर जिंकणार असा दावाही त्याने प्रेक्षकांसमोर केला.बॉलीवूडच्या अभिनेत्यांविषयी विचारले असता, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार अशी यादी त्याने वाचून दाखविली. सोबतच आपल्याला संधी मिळाली, तर रजनीकांतच्या चित्रपटातील चिट्टीची भूमिका आवर्जून करायला आवडेल, असे रोबो थेस्पिअनने नमूद केले. याशिवाय त्याने तरुणाईला थिरकवणाऱ्या गाण्यांवर नाच तर केलाच, शिवाय गाणेही गाऊन दाखविले. रोबो थेस्पिअनच्या कौशल्याने सर्वच थक्क झाले. संवाद कार्यक्रमानंतरचा आपला पुढचा कार्यक्रम हा टेकफेस्टच्या कॅफेटेरियाला भेट देणे, आंतरराष्ट्रीय रोबोवॉरची अंतिम स्पर्धा पाहणे आणि टेक्नोहॉलिक शो ला उपस्थिती दर्शविणे, आईन्स्टाईन ह्युमनॉइडचे लेक्चर अटेंड करणे अशी यादीही प्रेक्षकांना वाचून दाखविली.>विशेष मुलांचे संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी उपयुक्तरोबो थेस्पिअन उत्तम कलाकार आणि अभिनेता म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, या प्रकारच्या रोबोट्सचा वापर हा शारीरिकदृष्ट्या दिव्यांग मुलांना सांभाळण्यासाठी, त्यांच्या हालचाली वाढविण्यासाठी, त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी होत असल्याचे याच्या आयोजकांकडून सांगण्यात आले. या प्रकारचे ह्युमनॉइड रोबोट सांगितलेल्या हालचाली पुन्हा-पुन्हा करत असल्याने किंवा बोलण्यासाठी प्रोग्रॅम असल्याने विशेष मुलांचे संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी या रोबोचा वापर होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.