आग विझविण्यासाठी धावून येणार रोबो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 02:24 AM2018-04-11T02:24:50+5:302018-04-11T02:24:50+5:30

मुंबईत आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून काही वेळा आग विझविताना अग्निशमन दलाच्या जिवावरही बेतत आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणारा अत्याधुनिक रोबो लवकरच खरेदी करण्यात येणाार आहे.

Robo will run for fire | आग विझविण्यासाठी धावून येणार रोबो

आग विझविण्यासाठी धावून येणार रोबो

googlenewsNext

मुंबई : मुंबईत आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून काही वेळा आग विझविताना अग्निशमन दलाच्या जिवावरही बेतत आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणारा अत्याधुनिक रोबो लवकरच खरेदी करण्यात येणाार आहे. यासाठी पालिकेने जागतिक स्तरावर निविदा मागविल्या आहेत. अग्निशमन जवान पोहोचू शकत नाहीत तिथे या रोबोची मदत घेण्यात येणार आहे. यामुळे जीवित आणि वित्तहानी कमी होण्यास मदत होणार आहे. या रोबोसाठी पालिका १ कोटी १२ लाख रुपये खर्च करणार आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुरक्षेसाठी थ्री-लेयर हायटेक सूट महापालिकेने घेतला. त्यानंतर आता आगीच्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रवेश करून आग विझवण्याची यंत्रणा घेऊन जाणारा रोबो आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जगभरातून कोणतीही कंपनी आॅनलाइन अर्ज करू शकणार आहे. रोबोसाठी मागविण्यात आलेल्या निविदा ५ वर्षे मुदतीच्या असतील. संबंधित निविदाकाराला पाच वर्षे वॉरंटी आणि देखभाल करावी लागेल.
यासाठी घेतला रोबो
आगीचा भडका उडाल्यानंतर प्रचंड उष्णतेमुळे जवान त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. मात्र, अग्निशमन दलात दाखल होणारा हा रोबो आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ, चिंचोळ्या गल्ल्या, बेसमेंटची आग अशा ठिकाणी थेट जाऊन आगीवर नियंत्रण मिळवू शकणार आहे.
या रोबोला कॉम्प्युटरच्या माध्यमातून सूचना देऊन काम करून घेतले जाणार आहे. रोबोच्या क्षमतेमुळे आणि तो अडगळीच्या ठिकाणी जाऊन आग विझवू शकणार असल्यामुळे आग भडकण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
आगीवर नियंत्रण
वेळेत शक्य
रोबोमध्ये असलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने घटनास्थळी असणारी आगीची तीव्रता समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होईल. हा रोबो सेवेत येण्याआधी रोबोचा दर्जा आणि टेक्नॉलॉजीची तपासणी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात येणार आहे.

Web Title: Robo will run for fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.