सागरी प्रदूषणाविरोधी लढण्यासाठी ‘रोबो’ची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 05:54 AM2019-10-13T05:54:44+5:302019-10-13T05:54:55+5:30

आॅल-गर्ल्स रोबोटिक्स टीमचा पुढाकार । दुबईतील स्पर्धेत करणार भारताचे नेतृत्व

Robo's help in the fight against maritime pollution | सागरी प्रदूषणाविरोधी लढण्यासाठी ‘रोबो’ची मदत

सागरी प्रदूषणाविरोधी लढण्यासाठी ‘रोबो’ची मदत

Next

सीमा महांगडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रोबोटिक्स, इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी म्हटले की, तसा मुलींचा सहभाग आणि टक्का कमीच अशी सामान्य समजूत आहे. मात्र, हा समजच चुकीचा ठरविण्यासाठी आॅल-गर्ल्स रोबोटिक्स टीम सज्ज झाली आहे. या आॅल-गर्ल्स रोबोटिक्स टीमचा रोबो सागरी प्रदूषणाशी दोन हात करण्यासाठी सज्ज होत आहे. सागरी प्रदूषण कमी करण्यासाठीच्या जागतिक पातळीवर दुबईत होणाऱ्या स्पर्धेत ही टीम भारताचे नेतृत्व करणार आहे.


या टीममधील आरुषी, राधिका, आयुषी, जसमेहर आणि लावण्या धारावीतील वंचित आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांना स्टेम (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग, मॅथमॅटिक्स) शिकवित आहेत. सोबतच लैंगिक असमानता कमी करून आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि निर्भय मुलींचे जग निर्माण करण्यासाठी या मुली प्रयत्नशील आहेत.
दुबई येथे २४ ते २७ आॅक्टोबर दरम्यान फर्स्ट ग्लोबल चॅलेंज स्पर्धा होणार असून, ‘सागरी संकल्पना’ ही या स्पर्धेची संकल्पना आहे. सागरी जीवनावर प्रदूषण आणि लोकसंख्येचे परिणाम या विषयावर भर देण्यात आला आहे. रोबोटिक्सच्या माध्यमातून या समस्येवर कशी मात करता येईल, हे स्पर्धकांना आपल्या प्रकल्पातून मांडायचे आहे. यामध्ये जगातील १९३ देशांतील २,००० हून अधिक विद्यार्थी (वय १४ ते १८) सहभागी होणार आहेत.


भारतातील स्टेम एज्युकेशन या संस्थेकडून ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या चार फेऱ्यांच्या निवड प्रक्रियेनंतर अंतिम ५ मध्ये मुंबईतील ४ शाळांमधून ९ ते १२ ग्रेड्समधील मुलींची निवड करण्यात आली. यामध्ये आरुषी (बॉम्बे इंटरनॅशनल स्कूल), राधिका (ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल), आयुषी(धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल), जसमेहर (पोदार इंटरनॅशनल स्कूल) आणि लावण्या (धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल) यांचा समावेश आहे.
समुद्रात फेकले जाणारे प्लास्टीक हे जलप्रदूषणाची कसे घटक ठरते आणि ते गोळा करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे सांगणारा हा प्रकल्प आॅल-गर्ल्स रोबोटिक्स टीमकडून स्पर्धेत सादर केला जाणार आहे. या रोबोवर सध्या या मुली काम करत असून ते अंतिम टप्प्यात आहे. या रोबोटिक प्रकल्पात आरुषी ही टीममध्ये रोबोट डिझाइन, रचनात्मक आणि इलेक्ट्रिकवर काम करत आहे, तर राधिका निधी उभारणी आणि प्रोग्रामिंगची जबाबदारी पार पडत आहे. आयुषीने धोरणात्मक आणि रचनात्मक कामांवर, तसेच जसमेहरने प्रोग्रामिंग आणि धोरणात्मक मांडणीवर लक्ष केंद्रित केले आहे. लावण्या रोबोची रचना आणि धोरण पाहात आहे.

आतापर्यंत होते केवळ मुलांचेच वर्चस्व
संपूर्ण मुलींची टीम जागतिक पातळीवरील स्पर्धेत रोबोटिक आव्हानाला सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्टेममधील शिक्षणात आतापर्यंत मुलांचेच वर्चस्व असल्याचे दिसून येत होते. याशिवाय या मुली स्टेमसंदर्भातील शिक्षण तळागाळातील इतर घटकांपर्यंत पोहोचविण्यातही सक्रिय सहभाग घेत आहेत आणि इतर मुली यामुळे प्रोत्साहित होत आहेत.
- मीनल मुजुमदार, प्रकल्प मार्गदर्शिका

जिद्दीने झपाटलेल्या मुलींचा अथक परिश्रमावर भर
दुबई येथे २४ ते २७ आॅक्टोबरदरम्यान फर्स्ट ग्लोबल चॅलेंज स्पर्धा होणार असून, ‘सागरी संकल्पना’ ही या स्पर्धेची संकल्पना आहे. या स्पर्धेच्या चार फेºयांच्या निवड प्रक्रियेनंतर अंतिम ५ मध्ये मुंबईतील ४ शाळांमधून ९ ते १२ ग्रेड्समधील मुलींची निवड करण्यात आली. यामध्ये आरुषी (बॉम्बे इंटरनॅशनल स्कूल), राधिका (ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल), आयुषी (धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल), जसमेहर (पोदार इंटरनॅशनल स्कूल) आणि लावण्या (धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल) यांचा समावेश आहे. स्पर्धेतील आव्हानाला रोबोटिक्सच्या माध्यमातून सामोरे जाण्याच्या जिद्दीने झपाटलेल्या या पाचही मुलींनी अथक परिश्रमावर भर दिला आहे.

Web Title: Robo's help in the fight against maritime pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.