रोबोने विझविली बोरिवली येथील शॉपिंग सेंटरची आग; धुराचे लोट सर्वात मोठा अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:10 PM2020-07-11T13:10:18+5:302020-07-11T13:18:30+5:30
शनिवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या येथील आग सुमारास नियंत्रणात आली. सुदैवाने या आगीत जिवीतहानी झाली नसली तरी मोठया प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.
मुंबई : बोरीवली पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद रोडवरील इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरमध्ये शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी १४ फायर इंजिन, १४ जम्बो टँकर आणि एक फायर रोबोटच्या मदतीने आग शमविण्याचे काम घेतले. शनिवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या येथील आग सुमारास नियंत्रणात आली. सुदैवाने या आगीत जिवीतहानी झाली नसली तरी मोठया प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.
येथील दुर्घटनाग्रस्त इमारत बेसमेंट अधिक तळमजला आणि वर दोन माळ्याची असून, इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागली होती. आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे आग शमविण्यास अग्निशमन दलास अडथळे आले. पहिल्या माळ्यावरदेखील आगीचा धूर पसरला होता. आग शमविण्यासाठी जेसीबीच्या मदतीने बेसमेंटला लावण्यात आलेल्या ग्रील तोडण्यात आल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठया प्रमाणात पसरत असलेला धूर आग शमविण्यात अडथळा ठरत होता. अशावेळी आग शमविण्यासाठी फायर रोबोची देखील मदत घेण्यात आली. दुपारी पावणे एक वाजेपर्यंत आग नियंत्रणाखाली आली असली तरी येथील आगीत मोबाईल, कपड्यांसह उर्वरित साहित्य जळून खाक झाले असून, येथील सुमारे ८० ते ९० गाळ्यांना आगीचा मोठा फटका बसला आहे.
मुंबईतल्या बोरिवलीतील शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग pic.twitter.com/xLjwNTwdzG
— Lokmat (@MiLOKMAT) July 11, 2020
दरम्यान, मुंबईत आगीच्या घटना घडत असून, यापूर्वी पवई हिरानंदानी येथील सहा मजली डेल्फाय या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. अंधेरी पूर्वेकडील नंदधाम इंडस्ट्रीयल इस्टेट, नरिमन पॉइंट येथील जॉली मेकर चेंबर आणि लोअर परळ येथील रघुवंशी मॉल कम्पाऊंड येथील पी २ इमारतीमध्ये, दारुखाना येथील सिग्नल हिल अॅव्हन्यू रोडवरील बॉम्बे टिंबर मार्टमध्ये आग लागली होती.