नवीन वर्षात रोबोट करणार रेल्वेची देखभाल; रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी नव्या सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 06:59 AM2018-12-28T06:59:14+5:302018-12-28T06:59:36+5:30
नववर्षाच्या सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पाच सुविधा देण्याची तयारी केली आहे. यात प्रवाशांना ट्रेनमध्ये शॉपिंगची सुविधा मिळेल.
मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पाच सुविधा देण्याची तयारी केली आहे. यात प्रवाशांना ट्रेनमध्ये शॉपिंगची सुविधा मिळेल. रेल्वेच्या देखभालीसाठी रोबोटचा वापर करण्यात येईल. तृतीयपंथीय ज्येष्ठ नागरिकांनाही तिकिटात सवलत मिळेल.
नवीन वर्षात प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी खास ८०० ट्रेन चालविण्यात येतील. यात मोफत वायफाय, बायो-टॉयलेट असेल. नवीन वर्षात विमानाप्रमाणे रेल्वेतही ‘आॅन बोर्ड शॉपिंग’ करता येईल. पश्चिम रेल्वेमार्गावर १६ मेल आणि एक्स्प्रेसमध्ये सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल. शॉपिंग कार्टमध्ये सौंदर्य, घर, किचनमधील सामग्री उपलब्ध असेल.
देशातील पहिली पंचतारांकित रेल्वे स्थानकांची सुरुवात होण्याची योजनाही नवीन वर्षासाठी आखण्यात आली आहे. हे स्थानक गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये आहे. या हॉटेलमध्ये १० मजले, ३०० खोल्या असतील. नव्या वर्षात रेल्वेच्या देखभालीसाठी रोबोट असतील. रेल्वेच्या नागपूरमधल्या अभियंता विभागात एक रोबोट तयार केला आहे. त्याला ‘उस्ताद’ असे नाव दिले आहे. हा रोबोट ट्रेनच्या खालील भागातील पार्टचे फोटो काढेल. त्यात तांत्रिक खराबी असल्यास नोटीस देईल. रोबोटमध्ये हाय डेफिनेशन कॅमेरे आहेत. ते ३२० डिग्रीच्या कोनातून व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी करण्यास सक्षम आहेत.
तृतीयपंथीयांसह ज्येष्ठ नागरिकांना सवलत
तृतीयपंथीय ज्येष्ठ नागरिकांना १ जानेवारी २०१९ पासून रेल्वे तिकिटात सवलत देण्यात येईल. ६० वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील तृतीयपंथीय ज्येष्ठ नागरिकांना ४० टक्के सवलत मिळेल. तर, ६० वर्षीय आणि त्यापुढील वयोगटातील पुरुष ज्येष्ठ नागरिकांना ४० टक्के तसेच ५८ वर्षीय आणि त्यापुढील वयोगटातील महिला ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत आहे.