Join us

पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स कार्यशाळा; मराठी, इंग्रजी माध्यमिक वर्गात प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 9:12 PM

- शेफाली परब- पंडितमुंबई - केवळ आर्थिक दुर्बल कुटुंबातील असल्याने उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने नवनवीन प्रयोग ...

- शेफाली परब- पंडित

मुंबई - केवळ आर्थिक दुर्बल कुटुंबातील असल्याने उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने नवनवीन प्रयोग सुरु केले आहेत. अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, जिज्ञासा, प्रयोगशीलता, विचार करण्याची क्षमता व त्यांचा व्यक्तिमत्व विकास केला जात आहे. त्याचप्रमाणे आता माध्यमिक शाळांमध्ये रोबोटिक्स कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र तूर्तास हा प्रकल्प मराठी व इंग्रजी माध्यमांमध्ये राबवण्यात येणार आहे.

सध्याचे युग हे विज्ञान युग म्हणून ओळखले जाते. यामध्ये रोबोटिक्स ही देखील महत्त्वाची शाखा आहे. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे रोबोटिक शिक्षणासाठी आग्रही होते. रोबोटचा वापर मोटार वाहन उद्योगात वाहनांच्या जोडणीसाठी करण्यात येतो. तसेच संरक्षण विभागात स्फोटके शोधणे व निकामी करणे, आरोग्य क्षेत्रात शस्त्रक्रियेसाठी वापर केल जातो. तर अंतराळ क्षेत्रातही इतर अन्य ग्रहांवर रोबोट पाठवून तेथील वातावरणावर संशोधन करण्यात येत आहे.

महापालिकेच्या शाळेत शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी आर्थिक दुर्बल कुटुंबातील असल्याने असे महागडे शिक्षण घेणे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे विज्ञानामधील महत्त्वाची शाखा असलेल्या रोबोटिक्स शाखेच्या कार्यशाळा आयोजित करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका महासभेत केली होती. या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत असा प्रयोग पालिकेच्या मराठी व इंग्रजी माध्यमांमध्ये करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अटल टिंकरिंग लॅबचा प्रयोग-

ए विभागातील कुलाबा पालिका माध्यमिक शाळेत सन २०१७ मध्ये, तर राजदा पालिका माध्यमिक शाळेत २०१८ मध्ये केंद्र सरकारच्या अटल टिंकरिंग प्रकल्पांतर्गत टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात आल्या. त्यानंतर २०१८- १९ मध्ये खाजगी सामाजिक बांधिलकीतून पालिकेची गुंदवली एमपीएस शाळा, पालीची मुंबई मनपा शाळा व गोवंडी स्टेशन मराठी शाळा या ठिकाणी अशा लॅबची स्थापना करण्यात आली. या लॅबमध्ये रोबोटिक्स तयार करण्याच्या घटकाचा समावेश करण्यात आला आहे.

अशी होणार शिक्षकांची नियुक्ती-

रोबोटिक्स हा एक नवीन विषय असल्याने सुरुवातीच्या काळात मराठी व इंग्रजी माध्यमिक शाळांमध्येच प्रयोग केला जाणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची एक कमिटी तयार केली जाणार आहे. या विषयाचे विशेष ज्ञान असणाऱ्या शिक्षकांना भेट तत्वावर नियुक्त करण्याचा पालिकेचा विचार आहे. या विषयासाठी आवश्यक उपकरणांची व्यवस्था व प्रशिक्षण व्यवस्था यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत.

टॅग्स :शाळा